Daval Malik Baba Devsthan Road Development Nashik
नाशिक | विशेष प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील अंतापूर परिसरातील श्री क्षेत्र दवल मलिक बाबा देवस्थान हे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील लाखो भाविकांच्या श्रद्धा, विश्वास आणि आध्यात्मिक भावनेचे केंद्र आहे. वर्षभर हजारो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. मात्र या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आणि रखडलेली विकासकामे यामुळे भाविकांना आजही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे. (Daval Malik Baba Devsthan Road Development Nashik)
गेल्या अनेक वर्षांपासून देवस्थानाकडे जाणारा मार्ग अतिशय धोकादायक अवस्थेत आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे, अरुंद रस्ता, मातीची घसरण आणि पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य यामुळे प्रत्येक प्रवास धोकादायक ठरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांग भाविकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यात हा मार्ग अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती स्थानिक आणि भाविक व्यक्त करत आहेत.
या गंभीर प्रश्नावर पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील श्री. जयेश संजय घुगे यांनी सातत्याने शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. विविध विभागांना निवेदने, पत्रव्यवहार आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून त्यांनी हा प्रश्न वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा विषय राज्यस्तरावर चर्चेत आला असला, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, श्री क्षेत्र दवल मलिक बाबा देवस्थानाच्या विकासासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार असून निधीलाही मंजुरी मिळालेली आहे. मात्र वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारक्षेत्रातील प्रशासकीय प्रक्रियेमुळे ही विकासकामे लालफितीत अडकली आहेत. निधी मंजूर असूनही प्रत्यक्ष कामांना सुरुवात न झाल्याने भाविकांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षित रस्त्यापासून आजही वंचित राहावे लागत आहे.
श्री. जयेश संजय घुगे यांनी या विषयातील त्रुटी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. मात्र जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी केवळ पत्रव्यवहारापुरतीच मर्यादित कारवाई केल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्षात रस्ता दुरुस्ती, सुरक्षा उपाययोजना आणि विकासकामे सुरू करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून या परिसराचा विकास करण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंजूर झालेला १० कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष कामांमध्ये का दिसत नाही? रस्त्याची दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा उभारण्यास इतका विलंब का होत आहे? असा सवाल आता भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
श्री क्षेत्र दवल मलिक बाबा देवस्थान हे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर लाखो भाविकांच्या श्रद्धा आणि विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारून तातडीने विकासकामांना सुरुवात करावी, अशी सर्वसामान्य भाविकांची मागणी आहे.
श्री. जयेश संजय घुगे तसेच स्थानिक भाविकांनी स्पष्ट भूमिका घेत “आता केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी” अशी मागणी केली आहे. रस्त्याचे काम, सुरक्षाव्यवस्था आणि मंजूर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
श्रद्धेच्या या पवित्र स्थळाचा विकास हा केवळ धार्मिक विषय नसून, लाखो भाविकांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक हिताचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने दिरंगाई न करता तातडीने विकासकामांना गती देणे ही काळाची गरज असल्याचे मत भाविक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
Daval Malik Baba Devsthan Road Development Nashik
भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला; नाशिक ग्रामीण पोलिसांची कठोर कारवाई, ९ आरोपी जेरबंद


[…] […]