Mobile Tower Fraud Alert Nashik
नाशिक : आपल्या घराच्या छतावर किंवा मालकीच्या जागेवर मोबाईल टॉवर उभारून दरमहा मोठे भाडे मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. मोबाईल टॉवर बसविण्याच्या नावाखाली बनावट वेबसाइट, फोन कॉल, मेसेज तसेच जाहिरातींचा वापर केला जात असल्याने नागरिकांनी अशा ऑफर्सची खात्री केल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
विशेषतः ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील जागामालकांना लक्ष्य करून काही ठिकाणी टॉवर उभारणीच्या बदल्यात दरमहा २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत भाडे मिळेल, असे सांगितले जात आहे. आकर्षक उत्पन्नाचे आमिष दाखवून नागरिकांकडून वैयक्तिक कागदपत्रे किंवा आर्थिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. _ Mobile Tower Fraud Alert Nashik
या फसवणुकीमध्ये सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलच्या नावाचा आणि ओळखीचा गैरवापर केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. बीएसएनएलच्या नावाने तयार केलेल्या बनावट संकेतस्थळांवर रूफटॉप मोबाईल टॉवरसाठी आकर्षक भाड्याच्या ऑफर्स दिल्या जात असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
अनोळखी व्यक्ती, क्रमांक किंवा संकेतस्थळावरून मोबाईल टॉवरसंदर्भात संपर्क झाल्यास त्यावर तातडीने विश्वास ठेवू नये. आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याची माहिती, ओटीपी, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील कागदपत्रांची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये. ऑनलाइन अर्ज किंवा नोंदणी करण्यापूर्वी संबंधित संकेतस्थळ अधिकृत आहे की नाही, याची पडताळणी करणे आवश्यक आहे.
मोबाईल टॉवर उभारणीसाठी नोंदणी शुल्क, प्रक्रिया शुल्क, परवानगी शुल्क किंवा अन्य कोणत्याही कारणाखाली पैसे मागितले जात असल्यास नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. केवळ मोठ्या भाड्याचे आश्वासन मिळाले म्हणून कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.
बीएसएनएलनेही सोशल मीडिया माध्यमातून नागरिकांना अशा बनावट टॉवर ऑफर्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या नावाने फोन, संदेश किंवा ऑनलाइन ऑफर प्राप्त झाल्यास त्याची अधिकृत माध्यमातून सत्यता तपासल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी._ Mobile Tower Fraud Alert Nashik
अशा प्रकारच्या संशयास्पद ऑफरमधून फसवणूक झाल्यास संबंधित फोन नंबर, मेसेज, वेबसाइटची लिंक, व्यवहाराची माहिती आणि इतर उपलब्ध पुरावे सुरक्षित ठेवावेत. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करावी.
मोबाईल टॉवरच्या नावाने मिळणाऱ्या अवास्तव उत्पन्नाच्या आश्वासनांना बळी न पडता नागरिकांनी जागरूक राहावे. संशयास्पद कॉल, संदेश किंवा ऑनलाइन ऑफर आल्यास कोणतीही घाई न करता त्याची खातरजमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
-महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दिपक सरोदे _Mobile Tower Fraud Alert Nashik

