Bhavali Dam Tourist Attack Nashik Rural Police Arrest 9 Accused
इगतपुरी (नाशिक) | प्रतिनिधी
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य भावली धरण परिसरात सहकुटुंब फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत धडक कारवाई करत नऊ आरोपींना अटक केली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
घटना नेमकी काय घडली?
रविवार, १२ जुलै २०२६ रोजी नाशिक शहरातील एक कुटुंब इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात सहकुटुंब फिरण्यासाठी गेले होते. धरण परिसरात फिरत असताना तेथे उपस्थित असलेल्या काही टवाळखोर तरुणांनी कुटुंबातील महिलांची छेड काढण्यास सुरुवात केली. महिलांनी स्वतःचा बचाव करत संबंधित तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळ वाद निर्माण झाला; मात्र कुटुंबीयांनी तो विषय तेथेच मिटवून कोणताही वाद न वाढवता तेथून निघण्याचा निर्णय घेतला.
मात्र, या घटनेचा राग मनात धरून संबंधित तरुणांनी कुटुंबाच्या कारचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्यांनी कार अडवून बेसबॉल स्टिक, लोखंडी रॉड, बांबूच्या काठ्या आणि इतर हत्यारांच्या साहाय्याने कारवर हल्ला केला. कारच्या चारही बाजूंच्या काचा फोडून वाहनाचे मोठे नुकसान करण्यात आले. याचवेळी कुटुंबावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या कुटुंबात महिला, पुरुष तसेच लहान मुले होती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले. हल्लेखोरांनी जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत कारचा पाठलाग करत सातत्याने दहशत निर्माण केली. या दरम्यान फिर्यादी महिलेचा विनयभंग करण्यात आला, तिच्या पतीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्यात आली तसेच साक्षीदाराचा मोबाईल फोनही लुटण्यात आला.
जीव वाचवण्यासाठी धावपळ करत संबंधित कुटुंबाने अखेर अंबड पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.
झिरो FIR दाखल करत तातडीने कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबड पोलिसांनी कोणताही विलंब न करता झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल केला आणि तत्काळ पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. त्यानंतर प्रकरण इगतपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३७०(२), ७४, ७८, ३२६(२), ३२४(४), ३२४(५), १८९ आणि १९१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
काही तासांत ९ आरोपी जेरबंद
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने वेगाने तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत इगतपुरी आणि सीमावर्ती भागात शोधमोहीम राबवत खालील ९ आरोपींना अटक करण्यात आली.
विशाल मच्छींद्र भटाटे (२७)
अनिकेत गणेश मानवेढे (२४)
अनिरुद्ध विठोबा भागडे (२५)
सागर उर्फ लोकेश गोकुळ गिते (२२)
विनोद लक्ष्मण बोराडे (२६)
सचिन दत्तू आडोळे (२९)
अर्जुन चिंधू आडोळे (२५)
देविदास कचरू भगत (२५)
अजय भुषण दालभगत (२०)
सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरण्यात आलेले टाटा योध्दा पिकअप (MH-46-CL-3634) जप्त करण्यात आले असून फरार आरोपी व गुन्ह्यात वापरलेल्या इतर वाहनांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक
या संपूर्ण प्रकरणात अंबड पोलीस ठाण्याने कोणताही नकार न देता तात्काळ झिरो एफआयआर दाखल करून पीडित कुटुंबाला दिलासा दिला. त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची सूत्रे हाती घेत अल्पावधीत आरोपींना अटक केली. या जलद आणि संवेदनशील कारवाईमुळे नाशिक पोलिसांवर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, सोशल मीडियासह विविध स्तरांतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
नाशिक ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, पर्यटकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पर्यटनस्थळी कायदा हातात घेणाऱ्या, महिलांची छेड काढणाऱ्या किंवा पर्यटकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर यापुढेही अशाच कठोर आणि प्रभावी कारवाया सुरू राहतील.
Bhavali Dam Tourist Attack Nashik Rural Police Arrest 9 Accused
गंगापूर धरणात 70.69% पाणीसाठा; तरीही शनिवारी पाणीपुरवठा बंद, निर्बंध हटविण्याची नाशिककरांची मागणी


[…] […]
[…] […]
[…] […]