Chandwad School Sports Planning Meeting 2026-27
चांदवड | प्रतिनिधी : संजय जाधव
नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि चांदवड तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नियोजनासाठी चांदवड तालुक्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील क्रीडाशिक्षकांची सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
ही सभा श्री नेमीनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, नेमीनगर, चांदवड येथे आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश संचेती होते. (Chandwad School Sports Planning Meeting 2026-27)
यावेळी उपस्थित क्रीडाशिक्षकांच्या सर्वानुमते शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी चांदवड तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. राकेश संचेती यांनी स्वीकारली. त्यांच्या निवडीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
सभेला डॉ. दत्ता शिंपी, शिवप्रसाद घोडके, सौ. शितल तावडे, संजय खैरनार, योगेंद्र पाटील, संदेश बुरड, दत्ता ठाकरे, जालिंदर वाघ, घनश्याम झुटे आणि अजय नायर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. राकेश संचेती यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा संस्कार रुजवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होतो, असेही त्यांनी नमूद केले.
सभेत तालुकास्तरीय दहा शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, वेळापत्रक, यजमान संस्था, पंच नियुक्ती, खेळाडू नोंदणी आणि स्पर्धांच्या नियमावलीसह विविध नियोजनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या सहविचार सभेस चांदवड तालुक्यातील ४६ क्रीडाशिक्षक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक निरंजन गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त मंडळ, पदाधिकारी, महाविद्यालय प्रशासन आणि सर्व क्रीडाशिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.
Chandwad School Sports Planning Meeting 2026-27
शाळा-कॉलेजमध्ये दाखल्यासाठी शुल्क आकारणी? विद्यार्थी व पालकांकडून कारवाईची मागणी

