Nashik Digital Arrest Cyber Fraud
नाशिक : मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक करण्याचा धाक दाखवत सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 42 लाख 60 हजार 434 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून आपण मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. तुमचा मनी लाँडरिंगच्या प्रकरणाशी संबंध असून, या प्रकरणात तुम्हाला अटक केली जाऊ शकते, अशी भीती आरोपींनी दाखवली.
यानंतर या कथित प्रकरणाच्या तपासाच्या नावाखाली संबंधित व्यक्तीवर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले.
आरोपींच्या सांगण्यावरून फिर्यादीने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ₹42,60,434 रुपये ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हे करीत आहेत. _ Nashik Digital Arrest Cyber Fraud
‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे काय?
सायबर गुन्हेगारांकडून सध्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना घाबरवून पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलीस, सीबीआय, ईडी किंवा अन्य तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर अटक करण्याची भीती दाखवत व्हिडीओ कॉलवर राहण्यास किंवा पैसे विशिष्ट खात्यावर ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते.
लक्षात ठेवा — ‘डिजिटल अरेस्ट’ ही कायदेशीर अटक प्रक्रिया नाही. कोणतीही तपास यंत्रणा फोन किंवा व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून नागरिकाला अटक करून त्याच्याकडून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत नाही.
अशा प्रकारचा संशयास्पद फोन, व्हिडीओ कॉल किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 वर संपर्क साधणे आवश्यक आहे.
-Nashik Digital Arrest Cyber Fraud


[…] […]
[…] […]