Drug-Free India Awareness Program at Hiray College
पंचवटी, नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या ‘नशामुक्त भारत, विकसित भारत की पहचान’ या अभियानांतर्गत हिरे नॉलेज कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती व व्यसनविरोधी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ANTFच्या पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बदलत्या काळानुसार नशेचे स्वरूपही बदलत असल्याने युवकांमध्ये नशाविरोधी जनजागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. _ Drug-Free India Awareness Program at Hiray College
विविध प्रकारचे व्यसनाधीन पदार्थ आज सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, तसेच व्यसनाचे व्यक्तीच्या आयुष्यावर आणि कुटुंबावर होणारे गंभीर दुष्परिणाम याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. “इतर कोणत्याही व्यसनापेक्षा विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे व्यसन लावून घ्यावे,” असा संदेश पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी यावेळी दिला. नशामुक्त जीवन जगणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ANTFचे सपोनी पंकज खरे यांनी नार्कोटिक्स, व्यसन आणि अमली पदार्थ यांतील फरक स्पष्ट करत अमली पदार्थांचे विविध प्रकार, नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे व्यसनाधीन पदार्थ तसेच त्यांचे शरीर व मनावर होणारे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. पंजाबमधील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येचा संदर्भ देत व्यसनाधीनतेची समस्या किती गंभीर आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होत नाही, तर संपूर्ण कुटुंबालाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे युवकांनी व्यसनापासून दूर राहून समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. _ Drug-Free India Awareness Program at Hiray College
ANTFचे संपत्ती भागवत यवहारे यांनी विविध कथांच्या माध्यमातून नशामुक्त राहण्याचे फायदे आणि व्यसनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. व्यसनाच्या आहारी गेल्याने व्यक्तीच्या स्वभावात नकारात्मक बदल होऊन त्याचा परिणाम कुटुंबावरही होत असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अनेक व्यक्तींचे जीवनदेखील व्यसनामुळे उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी पडू नये आणि कोणी व्यसन करण्यास प्रवृत्त करत असल्यास त्याला ठामपणे नकार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी जनजागृतीपर कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. भविष्यातील पिढी अधिकाधिक नशामुक्त राहणे गरजेचे असून युवक व्यसनाच्या आहारी गेल्यास त्याचा परिणाम देशाच्या भवितव्यावरही होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रकाश शेवाळे यांनी प्रास्ताविकातून ‘नशामुक्त भारत, विकसित भारत की पहचान’ या अभियानाची भूमिका आणि कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राकेश पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनश्री सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. वैष्णवी पगारे यांनी केले.
प्रतिनिधी : प्रथमेश महाले _ Drug-Free India Awareness Program at Hiray College

