Nashik Upnagar Police Bribe Case ACB Action
नाशिक | प्रतिनिधी : दीपक सरोदे
नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना ACB च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वादातून घडलेल्या एका आत्महत्येच्या घटनेत संबंधित व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगून तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.
या मागणीबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर ACB ने संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध सापळा रचला.
त्यानुसार, ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुमावत यांना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंगेहात पकडण्यात आले.
कारवाईदरम्यान ACB च्या पथकाने आवश्यक पुरावे गोळा करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेनंतर त्यांची पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे नाशिक पोलिस विभागात चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nashik Upnagar Police Bribe Case ACB Action
लेझीमच्या पारंपरिक तालात वधू-वरांचे अनोखे स्वागत; महिला पथकाच्या सादरीकरणाने जिंकली उपस्थितांची मने.


[…] […]