Sinnar Police Detain Two Illegal Bangladeshi Citizens
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील हॉटेल, लॉजेस तसेच इतर ठिकाणी संशयित व्यक्ती आणि अवैधरित्या भारतात वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत दि. १७ जुलै २०२६ रोजी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, सिन्नर शहरातील पांडवनगरी परिसरातील श्रुती अपार्टमेंटमध्ये एक पुरुष व एक महिला संशयास्पदरीत्या आपली ओळख लपवून राहत आहेत.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित फ्लॅटवर छापा टाकला असता एक पुरुष व एक महिला आढळून आले. सुरुवातीला त्यांनी आपली नावे मिलन सुलतान सरदार व वर्षा सुलतान शेख (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी सांगितली. त्यांच्याकडील आधारकार्ड संशयास्पद वाटल्याने त्यांना सिन्नर पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशीत त्यांनी आपली खरी ओळख पुढीलप्रमाणे असल्याचे सांगितले—
१) मिलन सुलतान सरदार (पुरुष)
वय : ३४ वर्षे
रा. जामरोल डंगा (७५००), सरदार वाडी, वॉर्ड क्र. ०६, ता. कालिया, जि. नराईल, बांग्लादेश.
२) बोरशा सुलतान मुनीर शेख उर्फ शिवली खानम हबीबउर रहमान रुबेल (महिला)
वय : ३३ वर्षे
रा. माधवपाशा, डाकघर-हिदिया ९२१०, ता. कालिया, जि. नराईल, बांग्लादेश.
झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून भारतात वास्तव्यास राहण्यासाठी तयार करण्यात आलेले बनावट आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सिमकार्ड व डेबिट कार्ड जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान संबंधितांकडे भारतात कायदेशीर वास्तव्यासाठी आवश्यक पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार निष्कासन (Deportation) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत हे दोघे सुरुवातीला मुंबई व सुरत येथे राहत होते आणि गेल्या एका वर्षापासून सिन्नर शहरात वास्तव्यास असून नाशिकमधील काही हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एस. मेंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या आदेशान्वये सपोनि प्रेमकुमार दांडेकर तसेच गुन्हे शोध पथकातील नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, प्रशांत सहाणे, आप्पासाहेब काकड, विलास बिडगर व महिला अंमलदार रुपाली डुंबरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Sinnar Police Detain Two Illegal Bangladeshi Citizens
मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला आळा घाला; ग्राहकांकडून नियमांवर फेरविचाराची मागणी


[…] सिन्नर शहरात अवैधरित्या वास्तव्यास अ… […]