Smart Meter Maharashtra Bill Issue
नाशिक प्रतिनिधी – दीपक सरोदे
नाशिक : महाराष्ट्रात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक ताण सहन करत आहेत. अशातच राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, वाढीव वीजबिलांच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक ग्राहकांचा दावा आहे की, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर त्यांच्या वीजबिलात लक्षणीय वाढ झाली आहे. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा अनेक पटीने जास्त रकमेची बिले आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेबाबत आणि बिलिंग प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काही भागांत नागरिकांनी स्मार्ट मीटरला विरोध दर्शवत आंदोलन केले असून, काही ठिकाणी तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी बिलांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राज्यभरासाठी याबाबत महावितरणकडून कोणतेही एकसमान अधिकृत धोरण जाहीर करण्यात आलेले नाही.
दरम्यान, स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहे की नाही, याबाबतही अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणांमध्ये घरातील वायरिंग किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे वीजबिल वाढू शकते, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
स्मार्ट मीटरबाबत सातत्याने वाढत असलेल्या तक्रारी आणि नागरिकांमधील संभ्रम लक्षात घेता, सरकार, महावितरण आणि संबंधित यंत्रणांनी वस्तुस्थिती स्पष्ट करून पारदर्शक चौकशी करावी, दोष आढळल्यास तातडीने त्यावर कारवाई करावी आणि ग्राहकांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Smart Meter Maharashtra Bill Issue


[…] स्मार्ट मीटर की स्मार्ट लुटारू मीटर? व… […]