Historic Wooden Bridge at Nachlondi in Dangerous Condition
नाचलोंढी (ता. पेठ) : हरसूल परिसरातील नाचलोंढी ग्रामपंचायत हद्दीतील चिंचपाडा येथे रास नदीवरील देवचोंडीचा ऐतिहासिक लाकडी पूल आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रशासनाच्या दीर्घकालीन दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर असून, दररोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करत आहेत.
स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या माहितीनुसार, हरसूल–नाचलोंढी, शेवखंडी, देवीचामाळ तसेच परिसरातील गावांना जोडण्यासाठी अनेक दशकांपूर्वी लोखंडी अँगल आणि मजबूत लाकडाच्या साहाय्याने या पुलाची उभारणी करण्यात आली होती. त्या काळात हा पूल संपूर्ण परिसरासाठी जीवनवाहिनी मानला जात होता आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रमुख आधार होता.
मात्र, कालांतराने आवश्यक देखभाल आणि दुरुस्ती न झाल्याने पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पुलावरील लोखंडी अँगल पूर्णपणे गंजले असून लाकडी फळ्या कुजून धोकादायक बनल्या आहेत. पुलावरील संरक्षक कठडेही मोडकळीस आल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, याच पुलावरून जात असताना यापूर्वी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. इतकी गंभीर घटना घडूनही संबंधित प्रशासनाने या पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, देवचोंडी धबधबा आणि परिसरातील निसर्गसौंदर्यामुळे या पुलाला पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठे महत्त्व आहे. पुलाखालून वाहणारा धबधबा आणि पायथ्याशी असलेला देवदहाड परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पहिल्याच पुरात पुलावरून पाणी वाहिल्याने त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून धोका अधिक वाढला आहे.
ग्रामस्थांनी या ऐतिहासिक पुलाचे तातडीने संरचनात्मक परीक्षण करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, तसेच पुरातत्त्व विभाग आणि संबंधित प्रशासनाने या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा आणखी एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Historic Wooden Bridge at Nachlondi in Dangerous Condition
स्मार्ट मीटर की स्मार्ट लुटारू मीटर? वाढीव वीजबिलांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम

