Godavari River Water Hyacinth Nashik
नाशिक | MHDU News
नाशिक शहरातील आनंदवली परिसरातून वाहणाऱ्या पवित्र गोदावरी नदीची अत्यंत चिंताजनक अवस्था समोर आली आहे. नदीपात्रावर जलपर्णीने अक्षरशः साम्राज्य निर्माण केले असून नदीचे पाणी दिसण्याऐवजी सर्वत्र हिरवागार थर पसरल्याचे चित्र आहे. पुरातन रामेश्वर महादेव मंदिराच्या परिसरालाही जलपर्णीने वेढा घातला असून, धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या या ठिकाणाची दयनीय अवस्था पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
गोदावरी नदी ही केवळ नदी नसून नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचे प्रतीक आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणारी जलपर्णी नदीचे सौंदर्य, पावित्र्य आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात आणत आहे. विशेष म्हणजे जलपर्णी ही केवळ हिरवीगार वनस्पती नसून नदीसाठी गंभीर संकट मानली जाते.
जलपर्णीचा प्रचंड फैलाव झाल्यानंतर नदीचा नैसर्गिक प्रवाह मंदावतो, अनेक ठिकाणी पाणी साचून राहते आणि पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे मासे व इतर जलचरांच्या जीवाला धोका निर्माण होतो. साचलेल्या पाण्यात डास, कीटक आणि रोगकारक जीवाणूंची वाढ होऊन डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. याशिवाय परिसरात दुर्गंधी पसरते, पाण्याची गुणवत्ता खालावते, प्रदूषण वाढते आणि नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते.
रामेश्वर महादेव मंदिरासारख्या धार्मिक स्थळाभोवती जलपर्णीचा वाढता विळखा भाविकांसाठीही चिंतेचा विषय ठरत आहे. गोदावरी नदीचे पावित्र्य, धार्मिक वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न (Godavari River Water Hyacinth Nashik)
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीची ही अवस्था अधिकच गंभीर ठरत आहे. प्रशासनाकडून नदी स्वच्छता, घाट सुशोभीकरण आणि विविध विकासकामे सुरू असल्याचे सातत्याने सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नदीपात्रातील परिस्थिती वेगळेच वास्तव दाखवत आहे.
गोदावरी स्वच्छतेच्या नावाखाली नियमित कामे सुरू असल्याचे सांगितले जाते, पाहण्या घेतल्या जातात, छायाचित्रे प्रसिद्ध केली जातात; मात्र प्रत्यक्ष नदीपात्रात वाढणारी जलपर्णी, साचलेले पाणी आणि अस्वच्छता पाहता ही कामे केवळ कागदोपत्री किंवा फोटोपुरतीच मर्यादित आहेत का, असा सवाल आता नाशिककर उपस्थित करत आहेत.
देश-विदेशातून लाखो भाविक कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. अशा वेळी आजच नदीची ही अवस्था असेल, तर काही महिन्यांनंतर परिस्थिती किती गंभीर होईल, याचे चित्र नाशिककरांच्या डोळ्यांसमोर उभे राहत आहे. कुंभमेळ्यासारख्या जागतिक धार्मिक सोहळ्यापूर्वीच गोदावरी नदीची स्वच्छता, पर्यावरण आणि पावित्र्य जपण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गोदावरी नदी स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना जाहीर होतात, निधी खर्च केला जातो आणि मोठमोठे दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात आनंदवली परिसरातील हे दृश्य अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
गोदावरीला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? संबंधित विभाग, नाशिक महानगरपालिका आणि प्रशासन या गंभीर समस्येची तातडीने दखल घेणार का? की कुंभमेळ्यापर्यंतही गोदावरी अशीच जलपर्णीच्या विळख्यात गुदमरलेली राहणार?
नाशिकची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे केंद्र असलेल्या गोदावरीला पुन्हा तिचे स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र रूप कधी मिळणार? याकडे आता संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
MHDU News : Vishal Baadane Godavari River Water Hyacinth Nashik


[…] जलपर्णीच्या विळख्यात गोदावरी; आनंदवल… […]
[…] जलपर्णीच्या विळख्यात गोदावरी; आनंदवल… […]