Surgana Earthquake Nashik July 2026
नाशिक | प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के सलग चौथ्या दिवशीही जाणवत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (28 जुलै) सकाळी 8:29 वाजता बोरगाव घाटमाथा परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सराड येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेच्या इमारतीला तडे गेल्याची घटना समोर आली आहे. तसेच चिखली गावात जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत भारडमाळ येथेही जमिनीला तडे गेल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे.
भूकंपाचा धक्का जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
ग्रामस्थांनी संबंधित यंत्रणांनी तातडीने परिसराची पाहणी करून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करावे, तसेच भूकंपाच्या कारणांचा शास्त्रीय अभ्यास करून योग्य ती माहिती जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
Surgana Earthquake Nashik July 2026
अटक टाळण्यासाठी 4 लाखांच्या लाचेची मागणी; तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक

