Nashik Draft Voter List 2026
नाशिक, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : नाशिक जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीत नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच मतदार यादीतील नोंदींबाबत दावे किंवा हरकती असलेल्या नागरिकांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येणार आहे.
तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनी आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह नमुना ६ भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होत्या. _ Nashik Draft Voter List 2026
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या ASDD मतदारांची यादी, तसेच त्यामध्ये नाव समाविष्ट न होण्याची संभाव्य कारणे संबंधित मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच नाशिक जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर नागरिकांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रारूप मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या पात्र मतदारांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना नमुना ६ भरून नाव नोंदविता येईल. मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८, तर संबंधित मतदारसंघातील एखादी नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत दाखल करता येणार आहे. हे अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध आहेत.
अर्ज करताना चुकीची घोषणा किंवा खोटे विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीला एक वर्षापर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. _ Nashik Draft Voter List 2026
दावे व हरकती दाखल करताना प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे दावा किंवा हरकत दाखल करणे आवश्यक आहे. एका अर्जामध्ये अनेक व्यक्तींचे वैयक्तिक दावे अथवा हरकती सादर करता येणार नाहीत. मात्र, एकाच घरातील किंवा कुटुंबातील सदस्यांशी संबंधित वैयक्तिक दावे अथवा हरकती एकत्रितपणे सादर करता येतील.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव किंवा अन्य तपशीलांमध्ये दुरुस्ती करणे तसेच अपात्र किंवा चुकीच्या नोंदींबाबत हरकत नोंदविता येणार आहे. _ Nashik Draft Voter List 2026
जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव तपासावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणारे युवक-युवती, स्थलांतरित मतदार आणि मतदार यादीतील तपशीलामध्ये बदल झालेल्या नागरिकांनी यादीची पडताळणी करावी.
दरम्यान, मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत पारदर्शकता, अचूकता आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य देण्यात येत आहे. मतदार यादीतील नोंदींची तपासणी करताना आढळणाऱ्या त्रुटी, विसंगती किंवा हरकतींबाबत संबंधितांना आपली बाजू मांडण्याची योग्य संधी दिली जाणार आहे. _ Nashik Draft Voter List 2026
SIR प्रक्रियेत राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर गणनापत्रकांचे वितरण करण्यात आले असून, BLO पासून पुढील स्तरापर्यंतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे.
मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विसंगती, ओळखविषयक माहिती, वयातील तफावत तसेच समान छायाचित्रांच्या नोंदींची तपासणी केली जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ गणनापत्रक भरून घेण्यापुरती मर्यादित नसून, प्राप्त माहितीची तांत्रिक पद्धतीनेही पडताळणी केली जात आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या बैठका घेऊन मतदार यादीच्या तपासणीसाठी त्यांच्या जिल्हा, महिला, युवा तसेच इतर घटकांच्या प्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. मतदान केंद्रस्तरापासून मतदारसंघस्तरापर्यंतच्या बैठकींमध्ये संबंधित प्रतिनिधींनी सहभागी होऊन प्रक्रिया समजून घ्यावी आणि आवश्यक हरकती किंवा सूचना प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
SIR प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारांना नोटीस बजावण्याची आवश्यकता असेल, त्यांना नियमानुसार नोटीस देण्यात येईल. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली बाजू मांडावी. कागदपत्रे व नोंदींची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
मोठ्या प्रमाणावर किंवा अनियमित पद्धतीने मतदारांची नावे वगळण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू नसून, प्रत्येक प्रकरणाची नियमानुसार तपासणी केली जात आहे, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. _ Nashik Draft Voter List 2026
नाशिक जिल्ह्यातील मतदार यादी पुनरावलोकनाची प्रक्रिया अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक गाव, प्रभाग आणि मतदान केंद्राच्या स्तरावर ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येत आहे.
नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आपले नाव आणि मतदार यादीतील तपशील योग्य असल्याची खात्री करावी. आवश्यक असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. _ Nashik Draft Voter List 2026
तसेच ज्या राजकीय पक्षांनी अद्याप बीएलए (Booth Level Agent) यांची नियुक्ती केलेली नाही, त्यांनी बीएलएची नियुक्ती करावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
News MHDU प्रतिनिधी : दिपक सरोदे _ Nashik Draft Voter List 2026

