Dindori Ashram School Student Suicide
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील आदिवासी विकास विभागांतर्गत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २७) सकाळी घडली. या घटनेने आश्रमशाळेतील विद्यार्थी तसेच परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हरीदास अंबादास शेखरे (वय १६, रा. गळवट, ता. सुरगाणा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरीदास हा जोपुळ येथील आश्रमशाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. आश्रमशाळेतीलच एका मुलीला त्याने प्रपोज केल्याचे समोर आले होते. याबाबत संबंधित मुलीने वर्गशिक्षकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वर्गशिक्षकांनी या प्रकरणाची माहिती मुख्याध्यापिकांना दिली. _ Dindori Ashram School Student Suicide
यानंतर विद्यार्थ्याला कार्यालयात बोलावून त्याला समज देण्यात आली होती. तसेच त्याच्या पालकांना बोलावून घेण्याबाबत सांगण्यात आले होते. या प्रकारामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, याबाबतही विद्यार्थ्याला सूचना करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, समज दिल्यानंतर हरीदास आपल्या निवासाच्या खोलीत गेला. काही वेळाने इतर विद्यार्थी खोलीत गेले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. विद्यार्थ्यांनी तत्काळ याबाबतची माहिती शिक्षकांना दिली.
घटनेची माहिती मिळताच शिक्षकांनी तातडीने विद्यार्थ्याला खाली उतरवून उपचारासाठी पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. _ Dindori Ashram School Student Suicide
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी : कुणाल दानेच _ Dindori Ashram School Student Suicide

