CM Office for Nashik Kumbh Mela Monitoring
नाशिक | MHDU News
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू असली, तरी अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय कामांमधील कथित टक्केवारी, स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि वाढती राजकीय गटबाजी याबाबतही चर्चा रंगत आहे.
कामांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असून, विविध कारणांमुळे कुंभमेळ्याशी संबंधित प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची प्रतिमा कोणत्याही प्रकारे मलिन होऊ नये, विकासकामांमध्ये त्रुटी राहू नयेत आणि संपूर्ण नियोजनावर थेट नियंत्रण ठेवता यावे, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.
याच अनुषंगाने नाशिकमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वतंत्र कुंभ नियंत्रण केंद्र स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री आणि समन्वयक यांच्या कामकाजासाठी शहरात स्वतंत्र कार्यालय उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत हे कार्यालय सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. (CM Office for Nashik Kumbh Mela Monitoring)
या कार्यालयासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी केली असून आवश्यक सुविधा, कार्यालयीन व्यवस्था आणि इतर मूलभूत गरजांचा प्राथमिक आढावा देखील घेतल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणानंतर किमान एक वर्ष हे कार्यालय कार्यरत राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील कुंभमेळ्याशी संबंधित घडामोडींवर स्वतः लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी आपल्या विश्वासू दूतांकडून सातत्याने माहिती घेतली असून, त्यानुसार काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर अधिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रतिनिधींनी नाशिकमध्ये येऊन विविध पदाधिकारी तसेच आमदारांशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे. या घडामोडींनंतर स्वतंत्र मुख्यमंत्री कार्यालय स्थापन करण्याच्या निर्णयाला अधिक वेग मिळाल्याचे सांगितले जात आहे.
अलीकडच्या काळात कुंभमेळ्यातील आखाडे आणि प्रशासन यांच्यातील काही वाद चर्चेत आले होते. त्याचबरोबर सुमारे २,८०० कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांमध्ये ठेकेदारांची कथित रिंग झाल्याच्या आरोपांनंतर चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कुंभमेळ्याबाबत कोणताही नकारात्मक संदेश जाऊ नये, कामांमध्ये पारदर्शकता राहावी आणि नियोजन अधिक प्रभावी व्हावे, या उद्देशाने सरकारने थेट हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रालयातून कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून विकासकामांसह स्थानिक राजकीय परिस्थितीचाही आढावा घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून, या माध्यमातून नाशिक शहर आणि जिल्ह्याला दीर्घकालीन पायाभूत सुविधा मिळाव्यात तसेच नाशिकचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग व्हावे, हा त्यामागील व्यापक उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
प्रयागराजनंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला अधिक भव्य, सुव्यवस्थित आणि यशस्वी स्वरूप देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारसमोर आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, नाशिकच्या राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात या निर्णयानंतर मोठी चर्चा सुरू झाली असून वातावरणही अधिक गंभीर बनल्याचे चित्र आहे.
CM Office for Nashik Kumbh Mela Monitoring
दिंडोरीतील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत भीषण आग; दोन कामगार जखमी, गॅस गळतीच्या अफवेने उडाली धावपळ


[…] […]