Zero Snakebite Death Campaign Nashik
नाशिक | प्रतिनिधी
सर्पदंशामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी “झिरो स्नेकबाईट डेथ” प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या (ICMR) अर्थसहाय्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम दिंडोरी व सुरगाणा या तालुक्यांमध्ये समुदायाच्या सक्रिय सहभागातून साकारला जाणार आहे.
या उपक्रमाची अंमलबजावणी वणी रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि संबंधित शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून केली जाणार असून, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयासह आवश्यक संस्थात्मक मान्यताही या प्रकल्पाला मिळाल्या आहेत.
प्रकल्पासाठी दिंडोरीतील ३२ आणि सुरगाण्यातील १६ अशा एकूण ४८ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीतून पाच जणांची निवड करून एकूण २४० समुदाय स्वयंसेवक तयार केले जाणार आहेत. ग्रामपंचायत सदस्य, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, बचत गटांचे सदस्य, सर्पदंशातून बरे झालेले नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा या स्वयंसेवकांमध्ये समावेश असेल.
स्वयंसेवकांना सर्पदंश प्रतिबंध, विषारी सापांची ओळख, योग्य प्रथमोपचार, तातडीने रुग्णालयात उपचार घेण्याचे महत्त्व तसेच अंधश्रद्धांना बळी न पडता वैज्ञानिक उपचारांचा स्वीकार करण्याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर हे प्रशिक्षित स्वयंसेवक गावागावांत जनजागृती करून नागरिकांना योग्य माहिती पोहोचवतील.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभाग तसेच ग्रामपंचायतींच्या संयुक्त सहभागातून हा प्रकल्प पुढे नेला जाणार आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागात सर्पदंशाच्या घटना तुलनेने अधिक असल्याने वेळेत उपचार मिळणे आणि योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे टाळता येण्याजोगे मृत्यू कमी करणे आणि सर्पदंशाविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
चार वर्षांच्या अभ्यासातून मिळणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यात महाराष्ट्रातील इतर सर्पदंशग्रस्त भागांमध्येही अशाच समुदायाधारित उपक्रमांची अंमलबजावणी करण्यास दिशा मिळेल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
Zero Snakebite Death Campaign Nashik
अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी; देवगावातील घटनेने खळबळ


[…] […]