Shrirampur Hotel Owner Murder Case
अहिल्यानगर | MHDU News
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या गंभीर घटनेने हादरले आहे. नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत हॉटेल मालकाचा मृत्यू झाला असून त्याचा भाऊ जखमी झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तिघेजण जेवणासाठी हॉटेलमध्ये आले होते. जेवणादरम्यान काही कारणावरून त्यांचा हॉटेल चालकांशी वाद झाला. काही क्षणांतच हा वाद चिघळला आणि संशयितांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात आकाश शेखर दुबय्या आणि कुणाल दुबय्या हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना आकाश शेखर दुबय्या यांचा मृत्यू झाला. कुणाल दुबय्या यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या झटापटीत एका हल्लेखोरालाही दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वाकचौरे आणि श्रीरामपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने शहरात नाकाबंदी करून तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, गेल्या 11 दिवसांत श्रीरामपूर शहरात घडलेला हा चौथा प्राणघातक हल्ला असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी वर्गासह नागरिकांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Shrirampur Hotel Owner Murder Case
81 तासांनंतर शोधमोहीम संपली; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह

