NCMC Card Deadline Extended – MSRTC
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवास सवलतींसाठी आवश्यक असलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) संदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्याची अंतिम मुदत आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
यापूर्वी १ ऑगस्ट २०२६ पासून एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र राज्यभरातील अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप प्रत्यक्ष स्मार्ट कार्ड मिळालेले नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुदतवाढ जाहीर केली आहे.
या निर्णयामुळे महिला, ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिक (५०% प्रवास सवलत) तसेच ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक (मोफत प्रवास) यांना दिलासा मिळणार आहे. मुदतवाढीच्या काळात पात्र प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलतीचा लाभ मिळत राहणार असून, दरम्यान त्यांनी लवकरात लवकर एनसीएमसी कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (NCMC Card Deadline Extended – MSRTC)
एनसीएमसी कार्ड प्रणालीमुळे एसटी प्रवासातील सवलती अधिक पारदर्शक, डिजिटल आणि कॅशलेस पद्धतीने देणे शक्य होणार आहे. कार्डमध्ये वॉलेट सुविधा असून त्यामध्ये रक्कम रिचार्ज करून सवलतीचे तिकीट काढता येते. राज्यभरात हजारो अधिकृत केंद्रांवर कार्ड नोंदणी व वितरण सुरू आहे.
(प्रतिनिधी : दीपक सरोदे) NCMC Card Deadline Extended – MSRTC
नाशिक म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात कार्यरत व निवृत्त मंडळ अधिकाऱ्यांना अटक


[…] […]