Nashik ST Bus Accident Ashok Marg
प्रतिनिधी : धीरज भावसार
नाशिक : नाशिकहून पुण्याकडे जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) एमएच 14 बीटी 4426 क्रमांकाची बस रविवारी दुपारच्या सुमारास अशोक मार्ग परिसरात रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात बसचे चालक, वाहक तसेच काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली. त्यानंतर जखमींना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.
या अपघातामुळे काही काळ अशोक मार्ग परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, द्वारका सर्कलकडील अवजड वाहतूक रहिवासी भागातून वळविण्यात आल्यापासून या परिसरात वारंवार छोटे-मोठे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वाढती वाहतूक, अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे वाहतूक व्यवस्थेचा तातडीने पुनर्विचार करून सुरक्षित व प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
Nashik ST Bus Accident Ashok Marg

