MSRTC Fare Hike Maharashtra July 2026
MHDU News प्रतिनिधी : दिपक सरोदे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बसच्या प्रवास भाड्यात १३.५८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, वाढत्या इंधन खर्चासह सुटे भाग, टायर, देखभाल आणि इतर प्रशासकीय खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले आहे.
या भाडेवाढीमुळे राज्यातील लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि रोजंदारीवर काम करणारे प्रवासी एसटी सेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने त्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
यापूर्वी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली असली, तरी त्याचवेळी नियमित भाड्यात १३.५८ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना कोणताही मोठा दिलासा मिळालेला नाही, अशी भावना अनेक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
चालू वर्षात एसटीच्या भाड्यात वारंवार वाढ करण्यात आल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. महागाईचा वाढता भार, दैनंदिन खर्च आणि प्रवासाचा वाढलेला खर्च यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महामंडळाच्या म्हणण्यानुसार, एसटीची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी आणि सुरक्षित, दर्जेदार व अखंड सेवा सुरू ठेवण्यासाठी ही भाडेवाढ आवश्यक आहे. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात सामान्य नागरिकांवर अतिरिक्त भार टाकण्याऐवजी पर्यायी उपाययोजना शोधण्याची गरज असल्याची मागणीही अनेक स्तरांतून होत आहे.
टीप : ज्येष्ठ नागरिक, महिलांना मिळणाऱ्या सवलतीच्या योजनांचा खर्च इतर प्रवाशांच्या भाड्यातून वसूल केला जात असल्याचा दावा काही नागरिकांकडून केला जात असला, तरी याबाबत एसटी महामंडळाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
MSRTC Fare Hike Maharashtra July 2026
एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या; संशयित तरुणानेही गळफास घेत संपवलं आयुष्य, इंदिरानगर हादरलं


[…] […]
[…] […]