Jalgaon DCC Bank Directors Disqualification Newsजळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांच्या अपात्रतेच्या मागणीची सहकार आयुक्तांनी दखल घेत विभागीय सहनिबंधकांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिले.

Jalgaon DCC Bank Directors Disqualification News

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (JDCC Bank) संचालक मंडळाविरुद्ध करण्यात आलेल्या अपात्रतेच्या मागणीची राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र यांनी दखल घेतली असून, विभागीय सहनिबंधक, नाशिक यांना या प्रकरणात तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

झुरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा गो. पाटील यांनी सहकार आयुक्तांकडे सादर केलेल्या निवेदनात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बँकिंग रेग्युलेशन (सुधारणा) अधिनियम, २०२५, रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक सूचना तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

या निवेदनाची सहकार आयुक्त कार्यालयाने अधिकृत दखल घेत संबंधित विभागीय सहनिबंधकांना तातडीने आवश्यक कार्यवाही करून अर्जदारास त्याबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, बँकिंग लॉज (सुधारणा) अधिनियम, २०२५ अंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालकांच्या सलग कार्यकाळावर मर्यादा आणण्यात आली असून, राज्यातील अनेक सहकारी बँकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारनेही या संदर्भात संबंधित यंत्रणांना सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून, RBI नेही या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

या घडामोडींमुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या वैधतेबाबतच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. आता विभागीय सहनिबंधकांकडून या प्रकरणात नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

टीप : सध्या सहकार आयुक्तांनी केवळ निवेदनाची दखल घेऊन चौकशी व आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. संचालकांना अद्याप अपात्र घोषित करण्यात आलेले नाही. अंतिम निर्णय संबंधित सक्षम प्राधिकरणाच्या कार्यवाहीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Jalgaon DCC Bank Directors Disqualification News

तुकाराम मुंढेंचा दणका! सिन्नरसह जिल्ह्यात किराणा दुकानांतून खुले खाद्यतेल व विनालेबल फरसाण वर कारवाई

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *