Nashik Indiranagar Murder Case
नाशिक | MHDU News
नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. एका तरुणीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासांत या प्रकरणातील संशयित तरुणाचा मृतदेहही आढळून आल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्राथमिक तपासात ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मृत तरुणीची ओळख वैष्णवी अनिल आवारे अशी झाली असून ती मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी होती. शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने ती नाशिकमध्ये इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटी परिसरात पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहत होती.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी (17 जुलै) रात्री सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास वनसंपदा सोसायटीच्या गार्डनजवळ ही घटना घडली. त्या वेळी वैष्णवी परिसरातून जात असताना संशयित तरुणाने तिचा मार्ग अडवत अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. तिच्यावर सलग वार करण्यात आल्याने ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. मात्र, गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या हत्येनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला असता, शनिवारी पहाटे इंदिरानगरमधील जॉगिंग ट्रॅक परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह हत्येतील संशयिताचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःही आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक निष्कर्ष तपास यंत्रणांकडून काढण्यात येत आहे.
या घटनेमागे एकतर्फी प्रेमाचे कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. दोघांमधील पूर्वीचा परिचय, मोबाईल कॉल रेकॉर्ड, संदेश, तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. फॉरेन्सिक पुरावे आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, वैष्णवीच्या निधनाची माहिती मिळताच तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच आई-वडिलांनी घटनास्थळी आक्रोश केला. या घटनेमुळे इंदिरानगर परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांकडून अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास इंदिरानगर पोलीस करत असून, अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
Nashik Indiranagar Murder Case
बिल्डरविरोधात फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी 30 जुलैला आत्मदहनाचा इशारा

