Nashik Earthquake Tremors Peth Surgana Dindori
नाशिक : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी या तीन तालुक्यांतील विविध भागांना आज, १७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसर तसेच पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ आणि हरणगाव या भागात दुपारी १२:४० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांनी, १२:४५ वाजता, दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि बागडीचा पाडा परिसरातही जमिनीला हादरे बसल्याचे सांगण्यात आले आहे._Nashik Earthquake Tremors Peth Surgana Dindori
अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे काही ठिकाणी नागरिक घराबाहेर पडल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या सौम्य हालचालींची वारंवार नोंद होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, नाशिक परिसरातील वारंवार होणाऱ्या भूकंपीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये नाशिक आणि परिसरात अनेक सौम्य भूकंपीय धक्के जाणवले आहेत. उपलब्ध वृत्तांनुसार, महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर परिसरात अल्प कालावधीत अनेक भूकंपीय हालचालींची नोंद झाली असून तज्ज्ञ त्याचा अभ्यास करत आहेत.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-प्रतिनिधी : कुणाल दानेच Nashik Earthquake Tremors Peth Surgana Dindori

