Dilip Gavit Commonwealth Games Gold Medal 2026
नाशिक | MHDU News
भारतीय पॅरा ॲथलेटिक्ससाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यातील सुपुत्र दिलीप महादू गावित याने ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. पुरुषांच्या T47 गटातील 100 मीटर स्पर्धेत त्याने अवघ्या 10.71 सेकंदांत शर्यत पूर्ण करत स्पर्धेचा नवा गेम्स रेकॉर्ड प्रस्थापित केला. याच स्पर्धेत भारताच्याच मोहम्मद बासिल याने 10.83 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले, तर इंग्लंडच्या केविन सँटोस याला 10.85 सेकंदांसह कांस्यपदक मिळाले.
या विजयानंतर दिलीप गावित हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष पॅरा-ॲथलीट ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा इतिहासात त्याच्या नावाची सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आहे.
पाचव्या वर्षी हात गमावला, पण जिद्द कधी हरली नाही (Dilip Gavit Commonwealth Games Gold Medal 2026)
दिलीप गावित यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील तोरण डुंगरी या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील महादू गावित आणि आई जिजाबाई गावित हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. स्वतःची शेती नसल्याने दुसऱ्यांच्या शेतात काम करून त्यांनी मुलांचे संगोपन केले.
दिलीप अवघा पाच वर्षांचा असताना झाडावरून पडून त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. दुर्गम भाग असल्याने तातडीचे उपचार मिळू शकले नाहीत. आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची असल्याने उपचार उशिरा सुरू झाले. परिणामी त्याच्या हाताला गँग्रीन झाला. संसर्ग शरीरात पसरू नये म्हणून डॉक्टरांना त्याचा उजवा हात कोपराखालून कापावा लागला.
ही घटना कोणत्याही लहान मुलासाठी आयुष्य बदलणारी ठरली असती. मात्र दिलीपने अपंगत्वाला आपली कमजोरी न मानता त्याच जिद्दीला ताकद बनवली.
गरिबीशी दोन हात करत धावला यशाकडे (Dilip Gavit Commonwealth Games Gold Medal 2026)
डोंगराळ भागात वाढलेल्या दिलीपला लहानपणापासून धावण्याची आवड होती. गावातील चढ-उताराच्या रस्त्यांवर तो इतर मुलांपेक्षा अधिक वेगाने धावत असे. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. खेळाडूसाठी आवश्यक असलेला सकस आहार, प्रशिक्षण आणि साहित्य उपलब्ध करून देणे कुटुंबासाठी मोठे आव्हान होते.
तरीही त्याचे आई-वडील स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलाच्या स्वप्नांसाठी झटत राहिले. अनेकदा स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांनी त्याला शक्य तेवढा आधार दिला.
प्रशिक्षकांनी ओळखली प्रतिभा
एका स्थानिक स्पर्धेदरम्यान नाशिकमधील व्हीके स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्या नजरेत दिलीपची धावण्याची क्षमता भरली. त्यांनी त्याची परिस्थिती पाहून अकॅडमीत मोफत प्रशिक्षणाची संधी दिली.
यासोबतच राहण्याची व्यवस्था, पौष्टिक आहार, ट्रॅक शूज आणि आवश्यक प्रशिक्षणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली. दिलीप मूळतः 400 मीटर स्पर्धेचा धावपटू होता. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेसाठी त्याच्या वेगाचा अभ्यास करून प्रशिक्षकांनी त्याला 100 मीटर स्प्रिंट प्रकारात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय सुवर्णपदकाच्या रूपाने यशस्वी ठरला.
जागतिक दर्जाचे प्रशिक्षण (Dilip Gavit Commonwealth Games Gold Medal 2026)
सध्या दिलीपला भारत सरकारच्या टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) तसेच ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट (OGQ) यांच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, फिजिओथेरपी, वैज्ञानिक फिटनेस आणि आहाराचे मार्गदर्शन मिळत आहे. या सुविधांमुळे त्याच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत गेली.
“हात नसलेला मुलगा काय धावणार?”
दिलीप प्रशिक्षणासाठी नाशिकला गेल्यानंतर काही जणांनी त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. “हात नसलेला मुलगा काय धावणार?” अशा टोमण्यांनाही त्याला सामोरे जावे लागले. मात्र त्याच्या आई-वडिलांनी समाजातील नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करून मुलावर विश्वास ठेवला.
त्याच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “आम्ही आयुष्यभर मजुरी केली. आमच्या मुलाने आज देशासाठी सुवर्णपदक जिंकून आमचे आयुष्य सार्थ केले. यापेक्षा मोठा आनंद नाही.”
भारतासाठी दुहेरी आनंद (Dilip Gavit Commonwealth Games Gold Medal 2026)
पुरुषांच्या T47 100 मीटर स्पर्धेत भारताने एकाच वेळी सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. दिलीप गावितच्या सुवर्णपदकासोबत मोहम्मद बासिलच्या रौप्यपदकामुळे भारताच्या पदकतालिकेत मोठी भर पडली.
दिलीपची ही कामगिरी केवळ एका खेळाडूचा विजय नाही, तर ग्रामीण भागातील संघर्ष, आई-वडिलांचे त्याग, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि अथक मेहनतीने कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, याचा प्रेरणादायी संदेश देणारी आहे.
Dilip Gavit Commonwealth Games Gold Medal 2026
पेपरफुटी, शिक्षक भरती, महा आयडीनंतर आता पुणे विद्यापीठातील कथित ₹3 लाख बी.कॉम. डिग्री प्रकरणाने खळबळ


[…] नाशिकच्या दिलीप गावितची राष्ट्रकुल स… […]