Nashik FDA Supari Scam Officers Suspended
नाशिक : अन्न व औषध प्रशासनातील (FDA) कथित अखाद्य सुपारी गैरव्यवहार प्रकरणाने राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मालेगावमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे १० कोटी रुपये किमतीच्या सुपारीच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याच्या आरोपांवरून नाशिक विभागातील तीन सहआयुक्तांसह पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गुरुवारी रात्री उशिरा यासंदर्भातील आदेश जारी केल्याची माहिती आहे.
नेमके प्रकरण काय?
एफडीएच्या गुप्तवार्ता विभागाने ११ फेब्रुवारी २०२४ रोजी मालेगाव येथे कारवाई करत ११ ट्रकांमधून ३,८०५ पोती अखाद्य सुपारी जप्त केली होती. या साठ्याचे एकूण वजन २९२.३८ मेट्रिक टन असून त्याची अंदाजित किंमत सुमारे १० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. अन्न विश्लेषणाच्या तपासणीत ही सुपारी मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे निष्पन्न झाले होते. _Nashik FDA Supari Scam Officers Suspended
यानंतर ७ मार्च २०२५ रोजी न्यायालयाने संबंधित सुपारी पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश दिले. मात्र, ती प्रत्यक्षात नष्ट न करता कागदोपत्री विल्हेवाट लावल्याचे दाखवण्यात आले आणि साठा काळ्या बाजारात वळवण्यात आल्याचा गंभीर आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
चौकशी अहवालात काय समोर आले?
या प्रकरणातील अनियमितता आणि चौकशीशी संबंधित कागदपत्रे दडपल्याच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अहवालात न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीतील कथित त्रुटी आणि शासकीय दस्तऐवज लपवण्यासंदर्भातील गंभीर बाबी समोर आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. _ Nashik FDA Supari Scam Officers Suspended
निलंबित अधिकाऱ्यांची नावे
- अविनाश दाभाडे — सहआयुक्त, नाशिक
- अमित रासकर — सहआयुक्त, नाशिक
- गोपाळ कासार — सहआयुक्त, नाशिक
- सुवर्णा महाजन — सहाय्यक आयुक्त, धुळे
- योगेश देशमुख — सहआयुक्त, मुंबई
प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
अखाद्य सुपारीसारख्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या पदार्थाची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेतच गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आल्याने अन्नसुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जप्त केलेला साठा प्रत्यक्षात नष्ट करण्यात आला होता का, तो काळ्या बाजारात वळवण्यात आला का आणि या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका होती, याची उत्तरे पुढील तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
_ Nashik FDA Supari Scam Officers Suspended

