Nashikroad Woman Blackmail Case
नाशिकरोड : रेल्वे स्थानकावर सोडण्याच्या बहाण्याने ओळखीच्या महिलेला घरी बोलावून शीतपेयातून गुंगीकारक औषध दिल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप नाशिकरोड परिसरात समोर आला आहे. तसेच महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते नातेवाईक तसेच समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता रवींद्र रघुनाथ दळवी (रा. पारशीवाडी, कोपरी कॉलनी, ठाणे) याने महिलेला रेल्वे स्थानकावर सोडण्याच्या कारणास्तव आपल्या फ्लॅटवर बोलावले. महिला तेथे पोहोचल्यानंतर संशयिताने तिला शीतपेयातून गुंगीकारक औषध दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. _ Nashikroad Woman Blackmail Case
यानंतर महिला असहाय्य अवस्थेत असताना संशयिताने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आल्याचेही महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
त्यानंतर हे फोटो-व्हिडिओ नातेवाईक तसेच समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत संशयिताने महिलेला विविध ठिकाणी नेले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात रवींद्र रघुनाथ दळवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२१/२०२६ असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
न्यूज महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Nashikroad Woman Blackmail Case

