Palse Girl Bicycle Drain Accident
नाशिक :
पळसे गावातून नाशिक सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या खोल नाल्यात परीक्षा आटोपून घरी जाणारी शाळकरी विद्यार्थिनी सायकलसह कोसळल्याची घटना घडली. नाल्यातील पाण्याचा प्रवाह कमी असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
श्री संत आईसाहेब महाराज न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आरोही तुकाराम गायधनी ही परीक्षा आटोपून सायकलवरून घरी जात असताना रस्त्यावर तिचा तोल गेला आणि ती सायकलसह नाल्यात पडली. तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिला नाल्यातून बाहेर काढले.
या घटनेत विद्यार्थिनीला दुखापत झाली असून तिला प्राथमिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाल्यात पाण्याचा प्रवाह कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली._ Palse Girl Bicycle Drain Accident
दरम्यान, या रस्त्यालगत सुमारे एक किलोमीटर लांबीच्या नाल्याला अनेक ठिकाणी संरक्षक कठडा नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या मार्गावर शाळकरी विद्यार्थी, शालेय वाहने, शेतीची वाहने आणि शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
यापूर्वीही या परिसरात स्विफ्ट कार, ॲक्टिवा आणि डंपरचे अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नाल्यालगत अर्धवट राहिलेले संरक्षक भिंतीचे काम तातडीने पूर्ण करून संपूर्ण नाल्याला सुरक्षा कठडा उभारावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
-प्रतिनिधी : सोपान रणपिसे _ Palse Girl Bicycle Drain Accident

