Jalgaon Muddemal Supurdgi Mohim
MHDU News जळगाव प्रतिनिधी – सुरेश पाटील
जळगाव : चोरीस गेलेला मुद्देमाल शोधून तो मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून नागरिकांच्या कष्टाच्या कमाईचा सन्मान करणारी आणि पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘मुद्देमाल सुपूर्दगी मोहिमे’ अंतर्गत चोरीस गेलेल्या मोटारसायकली, चारचाकी वाहने, मोबाईल फोन, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू संबंधित मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी गिरीश महाजन, संजय सावकारे, सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित, अशोक नखाते तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, चोरीला गेलेल्या वस्तू या केवळ मालमत्ता नसून त्या कुटुंबाच्या कष्टाची कमाई आणि भावनिक जिव्हाळ्याशी जोडलेल्या असतात. त्यामुळे त्या वस्तू शोधून मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही पोलीस दलाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. नागरिकांना त्यांचा हक्काचा मुद्देमाल परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या मोहिमेचे खरे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी जळगाव पोलीस दलाच्या तपास कार्याचे कौतुक करत गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच मुद्देमालाची तातडीने परतफेड करण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी तसेच मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले. (Jalgaon Muddemal Supurdgi Mohim)
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस विभाग आता अधिक आधुनिक आणि गतिमान झाल्याचे सांगत शासन नेहमीच पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले. पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक मित्रत्वाचे व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आमदार सुरेश भोळे यांनी या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पोलीस विभागाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे सांगितले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केल्याने त्यांचे मनोबल वाढल्याचेही त्यांनी नमूद केले.
या मोहिमेत जळगाव परिमंडळ, चाळीसगाव परिमंडळ आणि जळगाव जिल्हा सायबर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून एकूण ₹2 कोटी 16 लाख 84 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. यामध्ये चारचाकी वाहने, मोटारसायकली, मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने यांचा समावेश होता.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, विधी व न्याय विभागातील अधिकारी, पोलीस पाटील आणि तपासात सहकार्य करणाऱ्या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील नूतनीकरण करण्यात आलेल्या क्रीडा मैदानाचे उद्घाटनही करण्यात आले. या मैदानात ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, सिंथेटिक बॅडमिंटन कोर्ट, लॉन, आरओ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Jalgaon Muddemal Supurdgi Mohim
खर्दे येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन; सभामंडपासाठी डीपीडीसीतून निधी


[…] […]