Godavari Flood Alert Nandur Madhmeshwar Dam Water Release
नाशिक | MHDU News
घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता गोदावरी नदीच्या प्रवाहावर स्पष्टपणे दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला असून, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार, बुधवार (८ जुलै) रोजी दुपारी १ वाजता १८,४०३ क्युसेक असलेला विसर्ग पुढील काही तासांत सातत्याने वाढत गेला. दुपारी २ वाजता २८,९३४ क्युसेक, ३ वाजता ४०,१२३ क्युसेक, तर ४ वाजेपर्यंत तब्बल ५३,२२३ क्युसेक इतका करण्यात आला. अवघ्या तीन तासांत झालेली ही मोठी वाढ प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरली आहे.
पावसाचा वेग कायम राहिल्यास धरणातून आणखी पाणी सोडण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे गोदावरी नदीलगतच्या गावांमध्ये सतर्कता वाढविण्यात आली असून संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी नागरिकांना नदीपात्र, घाट, बंधारे आणि पूरप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत, अनावश्यक गर्दी टाळावी आणि केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन तसेच ग्रामपंचायत यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
गोदावरीच्या वाढत्या प्रवाहामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही तास हवामान आणि धरणातील विसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
Godavari Flood Alert Nandur Madhmeshwar Dam Water Release
तलावमय परिसर, जीवघेणे खड्डे; मंजुरीनंतरही काम रखडल्याने नागरिकांचा संताप


[…] नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विस… […]