Chandwad Tiranga Yatra 2026
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर चांदवडमध्ये देशभक्तीचा जागर
चांदवड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने चांदवड शहरात भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या यात्रेला विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहाल येथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ यांसह देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण चांदवड शहर दुमदुमून गेले.
यात्रेच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. विविध वयोगटातील नागरिकांचा लक्षणीय सहभाग हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजविणे, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव करून देणे आणि देशाची एकता व अखंडतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
भारत माता आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन – Chandwad Tiranga Yatra 2026
तिरंगा यात्रा शासकीय विश्रामगृह, चांदवड येथे पोहोचल्यानंतर आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांच्या उपस्थितीत भारत माता तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राष्ट्रहित, समाजसेवा आणि लोककल्याणाच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रगीत, वंदे मातरम् आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. राष्ट्रगीताच्या वेळी उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने उभे राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करणे गरजेचे : डॉ. राहुलदादा आहेर
यावेळी बोलताना आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांनी स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचे सांगितले.
देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती – Chandwad Tiranga Yatra 2026
या तिरंगा यात्रेस माजी आमदार श्री. शिरीषकुमार कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषणभैया कासलीवाल, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे, दत्तात्रय शिरोडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चांदवड शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी तिरंगा यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित केली. या उपक्रमातून ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
चांदवड प्रतिनिधी : संजय जाधव Chandwad Tiranga Yatra 2026

