Justice For Yash Delhi NEET Protestनिफाडच्या यश गोसावीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी दिल्लीत भावाचा आक्रोश; NEET परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न.

Justice For Yash Delhi NEET Protest

नाशिक : NEET-UG परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजी गावातील यश गोसावी या विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनात यशचा मोठा भाऊ अनिकेत गोसावी सहभागी झाला असून, हातात “Justice For Yash” असा फलक घेऊन आपल्या भावाला न्याय मिळावा, अशी भावनिक मागणी त्याने केली आहे.

यश गोसावी हा डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारा, अभ्यासू आणि मेहनती विद्यार्थी होता. वैद्यकीय शिक्षणासाठी त्याने NEET परीक्षेची अनेक महिने कठोर तयारी केली होती. कुटुंबीयांच्या मते, यंदा त्याला चांगले गुण मिळतील आणि एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळेल, अशी त्याला आणि कुटुंबाला आशा होती. मात्र परीक्षा झाल्यानंतर देशभरात पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या बातम्या समोर आल्यानंतर तो मानसिकदृष्ट्या खचला.

कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, परीक्षेभोवती निर्माण झालेला गोंधळ, भविष्यातील अनिश्चितता आणि वाढलेला मानसिक ताण यामुळे यशवर मोठा परिणाम झाला. २१ जून रोजी, पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. (Justice For Yash Delhi NEET Protest)

यशचे वडील अशोक गोसावी, जे दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथील शाळेत मुख्याध्यापक आहेत, यांनी सांगितले की, यशच्या चेहऱ्यावरून किंवा वागण्या-बोलण्यातून तो इतके टोकाचे पाऊल उचलेल, अशी कल्पनाही नव्हती. तो डॉक्टर होण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत होता. मात्र, परीक्षेनंतर सुरू झालेल्या घडामोडींनी त्याच्या मनावर प्रचंड ताण निर्माण झाला.

दिल्लीतील आंदोलनात अनिकेत गोसावीने कोणतीही घोषणाबाजी न करता शांतपणे “Justice For Yash” असा फलक हातात धरून आपल्या भावाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि भविष्यात NEET परीक्षा पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

गोसावी कुटुंब मूळचे करंजी (ता. निफाड) येथील असून, दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी काही महिन्यांपूर्वी ते नाशिक शहरातील आडगाव परिसरात वास्तव्यास आले होते. मोठा मुलगा अनिकेतने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून, धाकटा यश डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचे स्वप्न पाहत होता. मात्र आज त्या घरातील सर्व स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त झाली आहेत. (Justice For Yash Delhi NEET Protest)

“देशात चौकशी होईल, दोषींवर कारवाई होईल, परीक्षा व्यवस्थेत सुधारणा होतील… पण आमचा यश परत येणार आहे का?” असा हृदयद्रावक सवाल यशच्या वडिलांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रश्नाने देशभरातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या आंदोलनाला विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांनीही गोसावी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. यशच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

सध्या देशभरात NEET परीक्षा प्रक्रियेबाबत पारदर्शकता, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण, स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांवर व्यापक चर्चा सुरू असून, या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Justice For Yash Delhi NEET Protest

एम.जी. रोडवरील मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांविरोधात ग्राहकांच्या गंभीर तक्रारी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Justice For Yash Delhi NEET Protest : निफाडच्या यश गोसावीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी दिल्लीत भावाचा आक्रोश; परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह11”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *