Nashik Ploggers Drive 446 Tree Plantation at Chamar Leni
नाशिक | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत नाशिक प्लॉगर्स, वृक्षवल्ली फाउंडेशन आणि सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (SIOM), नाशिक यांच्या स्पंदन टीमच्या संयुक्त विद्यमाने ड्राईव्ह क्रमांक-४४६ अंतर्गत चामर लेणी परिसरात भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. सकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात ८० हून अधिक स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत २५० पेक्षा अधिक भारतीय वंशाच्या (Native) देशी वृक्षांची लागवड केली.
या अभियानाचा उद्देश शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासोबतच नागरिकांमध्ये जबाबदार आणि शाश्वत वृक्षारोपणाची जाणीव निर्माण करणे हा होता.
यावेळी नाशिक प्लॉगर्सचे संस्थापक तेजस तलवारे यांनी सांगितले की, “वृक्षारोपण हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नसून, प्रत्येक लावलेल्या रोपाची किमान पाच वर्षे काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण जितकी रोपे जपून वाढवू शकतो, तितक्याच रोपांची लागवड करावी. वृक्षारोपणाचे खरे यश लावलेल्या रोपांच्या संख्येत नसून, त्यापैकी किती रोपे मोठ्या वृक्षांमध्ये विकसित होतात यावर अवलंबून असते.”
नाशिक प्लॉगर्सने नागरिकांना वृक्षारोपणपूर्व तयारी (Pre-Plantation) तसेच वृक्षारोपणानंतरची देखभाल (Post-Plantation) या दोन्ही टप्प्यांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. सातत्यपूर्ण काळजी आणि संवर्धनातूनच पर्यावरणाचे खरे संरक्षण शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा उपक्रम नाशिक प्लॉगर्सचे संस्थापक तेजस तलवारे, उपाध्यक्ष अथर्व कोठावदे आणि वृक्षवल्ली फाउंडेशनचे अध्यक्ष सागर शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
गेल्या सात वर्षांपासून नाशिक प्लॉगर्स आणि वृक्षवल्ली फाउंडेशन यांनी संयुक्तपणे पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. या कालावधीत नाशिक शहरात १३,५०० हून अधिक भारतीय वंशाच्या देशी वृक्षांची लागवड करून हरित आच्छादन वाढविणे आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
“वृक्ष लावणे महत्त्वाचे आहेच; मात्र त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे ते जगवणे,” हा प्रेरणादायी संदेश या अभियानातून देण्यात आला.
Nashik Ploggers Drive 446 Tree Plantation at Chamar Leni


[…] चामर लेणी येथे २५० हून अधिक देशी वृक्ष… […]