Delhi Farmers Protest 2026 to cjp
नवी दिल्ली | MHDU News
देशाची राजधानी दिल्ली सध्या सलग आंदोलनांचे केंद्र बनली आहे. नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच आता भारत-अमेरिका प्रस्तावित मुक्त व्यापार करार (FTA) रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारसमोर एकाच वेळी दोन मोठी आंदोलने हाताळण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, आंदोलनस्थळी झालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी कारवाई केल्याचे वृत्त असून, त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दुसरीकडे, भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराला विरोध करत ‘देश बचाव मोर्चा’च्या नेतृत्वाखाली पंजाबसह विविध राज्यांतील शेतकरी शंभू सीमेवर एकत्र आले आहेत. प्रस्तावित FTA मुळे भारतीय शेती, दुग्धव्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो, असा शेतकरी संघटनांचा दावा आहे. परदेशी कृषी उत्पादनांची आयात वाढल्यास देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीकडे होणारी गर्दी लक्षात घेऊन शंभू सीमेसह संवेदनशील भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारण्यात आले असून, पोलीस, सुरक्षा दल, जेसीबी आणि क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत. काही मार्गांवरील वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
दरम्यान, भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम सिंग चदुनी यांना किसान महापंचायतीसाठी जात असताना हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अराजकीय संयुक्त किसान मोर्चा, किसान मजदूर मोर्चा आणि विविध राज्यांतील शेतकरी नेतेही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकरी संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. त्यामुळे दिल्लीतील पुढील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Delhi Farmers Protest 2026 to cjp
‘बस की भंगार?’ बर्डीपाडा–रगतविहिर मार्गावर एसटीचा बोजवारा; ब्रेक निकामी, प्रवाशांचा संताप

