Government Removes Two Loan Waiver Conditions
मुंबई | महादूत न्यूज
विधानभवनासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजनेत महत्त्वाचे बदल जाहीर करत दोन जाचक अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ उपस्थित होते. बैठकीत सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा, पीककर्ज वितरण, सिबिलची अट, बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई, सोयाबीन व कापसाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, शेतीसाठी वीज जोडणी, स्मार्ट मीटर, कृषी अनुदान अशा शेतकऱ्यांच्या सुमारे ३५ महत्त्वपूर्ण मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली २०२५-२६ ची जाचक अटही रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
बैठकीनंतर शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले की, कर्जमाफी योजनेतील उर्वरित अटी आणि निकषांमध्येही सकारात्मक बदल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी सरकारला उर्वरित आश्वासनांच्या अंमलबजावणीसाठी ८ ते १० दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास राज्यभरातील हजारो शेतकरी मुंबईत धडक देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले की, सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या सर्व न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.
Government Removes Two Loan Waiver Conditions
‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या आरोपांनंतर FDA ची कारवाई; सोलापूरमधील हॉस्पिटलचे मेडिकल सील


[…] Government Removes Two Loan Waiver Conditions : आंदोलनानंतर सरकारच… […]