Dr Hemlata Patil Ward 12 Road Digging Nashik
नाशिक : शहरातील विकासकामांच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महानगरपालिका ते कॅनडा कॉर्नर या रस्त्याचे अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले असताना, स्मार्ट सिटीच्या CCTV चेंबरसाठी हाच रस्ता पुन्हा फोडण्याचे काम सुरू झाले आहे. नव्याने तयार केलेला रस्ता पुन्हा खोदला जात असल्याने प्रभाग क्रमांक १२च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी संताप व्यक्त करत महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
महानगरपालिका ते कॅनडा कॉर्नर या रस्त्याचे काँक्रीटीकरण होऊन अवघे ३ ते ४ महिने झाले आहेत. तब्बल वर्षभर कामासाठी बंद असलेला हा रस्ता नुकताच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, नागरिकांना दिलासा मिळण्याआधीच याच रस्त्यावर स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुन्हा काँक्रीट फोडण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. (Dr Hemlata Patil Ward 12 Road Digging Nashik)
विशेष म्हणजे, काम सुरू असताना घटनास्थळी स्मार्ट सिटीचा एकही इंजिनिअर उपस्थित नसल्याचे समोर आले. याबाबत चौकशी केली असता, काम करणारे मजूर धुळ्याहून आलेले असल्याची माहिती मिळाली. (Dr Hemlata Patil Ward 12 Road Digging Nashik)
संबंधित ठेकेदार फिरोज यांच्याशी संपर्क साधला असता, ते देवळाली येथे असल्याचे सांगण्यात आले. तसेच, स्मार्ट सिटीच्या CCTV कॅमेऱ्यासाठी चेंबर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
या प्रकारावर प्रभाग क्रमांक १२च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रस्ता काँक्रीट करण्यापूर्वी CCTV च्या चेंबरचे नियोजन का करण्यात आले नाही? चार महिन्यांपूर्वी तयार केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ का आली? कामाच्या ठिकाणी महापालिका किंवा स्मार्ट सिटीचा इंजिनिअर उपस्थित का नव्हता? आणि या संपूर्ण नियोजनाच्या अभावाची जबाबदारी नेमकी कोणाची? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. (Dr Hemlata Patil Ward 12 Road Digging Nashik)
“हा विकास आहे की नागरिकांच्या पैशांचा अपव्यय?” असा थेट प्रश्नही डॉ. हेमलता पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, डॉ. हेमलता पाटील यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कुठल्याही लेखी स्वरूपातील परवानगीशिवाय कोणालाही रस्ते खोदण्यास मुभा देऊ नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
तसेच, सध्या फोडण्यात आलेला रस्ता मक्तेदार/ठेकेदाराकडून तात्काळ दुरुस्त करून घ्यावा, अशीही मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे. रस्ता दुरुस्ती करताना तो योग्य स्पेसिफिकेशननुसार पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
डॉ. हेमलता पाटील यांनी स्पष्ट केले की, “विकासकामांना आमचा विरोध नाही; पण विकासाच्या नावाखाली नियोजनशून्य कामांना आणि नागरिकांच्या पैशांच्या अपव्ययाला नक्कीच विरोध आहे.”
नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर अवघ्या काही महिन्यांत पुन्हा खोदकाम सुरू झाल्याने महापालिका, स्मार्ट सिटी आणि संबंधित यंत्रणांमधील नियोजन व समन्वयाचा अभाव समोर येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
आता महापालिका प्रशासन या प्रकरणाची काय चौकशी करते आणि नव्याने फोडण्यात आलेला रस्ता किती वेळेत पूर्ववत केला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Dr Hemlata Patil Ward 12 Road Digging Nashik


[…] चार महिन्यांपूर्वी काँक्रीट केलेला र… […]