CIDCO Ward 29 water shortage protest in Nashik
नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीव्र झालेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. प्रभागाच्या पहिल्याच सभेपूर्वी स्थानिक नागरिक आणि महिलांनी नगरसेवक भूषण राणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासनाविरोधात मोर्चा काढत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर तीव्र निषेध व्यक्त केला.
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या मांडत, नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तसेच टँकरद्वारे पाणी देण्याचे आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात टँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांवर थेट जाब विचारण्यात आला.
आंदोलनादरम्यान नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत करण्यात आले.
यानंतर झालेल्या सिडको प्रभागाच्या सभेत पाणीपुरवठा, दूषित पाणी, ड्रेनेज व्यवस्था आणि नालेसफाई हेच प्रमुख चर्चेचे विषय ठरले. सभेत उपस्थित नगरसेवकांनी सिडकोतील पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचे सांगत अनेक भागांमध्ये वेळेवर पाणी मिळत नसल्याची तसेच गढूळ व दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक सदस्यांनी सिडकोतील ३० ते ३५ वर्षे जुन्या ड्रेनेज लाईन तातडीने बदलण्याची मागणी केली. वाढत्या लोकसंख्येमुळे विद्यमान ड्रेनेज व्यवस्था अपुरी पडत असून वारंवार चेंबर तुंबणे, ड्रेनेज लिकेज आणि सांडपाणी रस्त्यावर येण्याच्या समस्या वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. संपूर्ण सिडकोसाठी नवीन डीपीआर तयार करून मोठ्या क्षमतेच्या ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याची मागणीही करण्यात आली.
पावसाळा सुरू झाल्यानंतरही अनेक नाल्यांची साफसफाई अपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. कागदोपत्री कामे दाखविण्याऐवजी प्रत्यक्षात नालेसफाई आणि मूलभूत सुविधा तातडीने सुधारण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, पाणीटंचाई, दूषित पाणी, ड्रेनेज आणि नालेसफाई या प्रश्नांवर सभागृहात सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांना दिलासा मिळेल अशा तातडीच्या आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केल.
Mahadut Janbindu : Vishal Bhadane

CIDCO Ward 29 water shortage protest in Nashik
Nashik : Residents of Ward No. 29 in Nashik’s CIDCO area staged a protest against the municipal administration over the worsening water crisis before the ward’s first official meeting. Led by corporator Bhushan Rane, local residents, especially women, demanded immediate action to ensure a regular drinking water supply.
Citizens alleged that despite assurances of tanker water supply, water tankers were not reaching affected areas. Officials were questioned directly, and protesters warned that their agitation would continue until a regular and clean water supply was restored.
The administration later assured that emergency measures had been initiated, following which the protest was called off.
During the ward meeting, water supply, contaminated drinking water, drainage issues, and incomplete nullah cleaning dominated the discussions. Corporators expressed concern over the deteriorating civic infrastructure and demanded replacement of the 30–35-year-old drainage network, preparation of a new DPR, installation of larger drainage pipelines, and immediate completion of pending desilting works before the monsoon intensifies.


[…] […]