धुळे, शिरपूर – शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ असलेल्या एस.व्ही.डी.के.एम. Shirpur NIMS College मध्ये एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव अथर्व राजपुरोहित (रा. खरगोन, मध्य प्रदेश) असे आहे. अथर्व हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याने Shirpur NIMS College परिसरातील एका वसतिगृहात गळफास घेतल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारच्या मध्यरात्री घडल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती समजताच शिरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, या घटनेमुळे कॉलेज परिसरात व विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अथर्वच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, त्याचे पालक शिरपूर येथे दाखल झाले आहेत. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिसांकडून सुरू आहे.

