Thakkar Bazaar Bus Station Accident Nashik
नाशिक : शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रविवारी रात्री ठक्कर बाजार बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने १८ वर्षीय युवती बसच्या चाकाखाली आली. या दुर्दैवी दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला.
आकांक्षा रामभाऊ शेलार (वय १८, रा. शिंदे पळसे) असे मृत युवतीचे नाव आहे. आकांक्षा कुटुंबीयांसोबत त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानकात आली होती. _ Thakkar Bazaar Bus Station Accident Nashik
रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस फलाटावर येताच प्रवाशांनी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली. या वेळी चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या आकांक्षाला गर्दीतून धक्का लागला. अचानक तोल गेल्याने ती बसच्या मागील चाकाच्या दिशेने खाली पडली. त्यानंतर बसचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. _ Thakkar Bazaar Bus Station Accident Nashik
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी आणि नातेवाइकांनी तातडीने आकांक्षाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेने ठक्कर बाजार बसस्थानकात काही काळ परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. आपल्या कुटुंबातील मुलगी डोळ्यांसमोर दुर्घटनेला बळी पडल्याने नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. आकांक्षाच्या आकस्मिक मृत्यूने शेलार कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. _ Thakkar Bazaar Bus Station Accident Nashik
दरम्यान, श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरकडे मोठ्या संख्येने भाविक रवाना होणार असल्याची पूर्वकल्पना असतानाही ठक्कर बाजार बसस्थानकातील गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
बसमध्ये चढताना होणारी गर्दी आणि रेटारेटी नियंत्रित करण्यासाठी योग्य बॅरिकेडिंग, अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तसेच वाढीव बससेवा वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. योग्य नियोजन झाले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशीही भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर मोठ्या धार्मिक सोहळ्यांच्या काळात बसस्थानकांवरील गर्दी व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासन आणि एसटी महामंडळाने सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Thakkar Bazaar Bus Station Accident Nashik

