Maharashtra Farmer Loan Waiver 2026
मुंबई | महादूत न्यूज
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अधिक व्यापक करण्यात आल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू असलेली ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची अट आता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे.
तसेच २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या अधिकाधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे ही योजना राबविण्यात येत आहे.
यापूर्वी २ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या निर्णयानुसार अशा पात्र शेतकऱ्यांनाही २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले.
Maharashtra Farmer Loan Waiver 2026


[…] […]