Nashik Ring Road Inquiry 2026
नाशिक | MHDU News
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठरलेल्या नाशिक रिंगरोड प्रकल्पाच्या अलाईनमेंटमध्ये बदल करण्यात आल्याच्या आरोपांनंतर राज्य सरकारने चौकशीचे आदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना पुढील तीन दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट केले. (Nashik Ring Road Inquiry 2026)
विधानसभेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी रिंगरोडची अलाईनमेंट जाणीवपूर्वक बदलण्यात आल्याचा तसेच त्यातून मोठ्या प्रमाणावर जमीन व्यवहार झाल्याचा आरोप उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण प्रकरणाची सखोल पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महसूलमंत्र्यांच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत रिंगरोड परिसरात झालेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहारांचीही चौकशी केली जाणार आहे. अलाईनमेंटमध्ये बदल करण्यामागे कोणताही अनुचित हेतू होता का, याचा तपास मुख्य सचिवांच्या माध्यमातून केला जाईल. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर आवश्यक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याविरोधात लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांचीही स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच भूसंपादनाच्या मोजणीवेळी हेल्मेट परिधान केलेल्या IAS अधिकारी दत्ता> यांच्या संदर्भात बोलताना, आंदोलनादरम्यान निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हेल्मेट घातल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सरकार कोणत्याही प्रकारची बळजबरी करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. भूसंपादन कायद्यानुसार योग्य मोबदला देण्यात येईल आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त मदतीबाबतही सकारात्मक भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाईल, असे सरकारने आश्वासन दिले.
Nashik Ring Road Inquiry 2026

