Jalgaon District Planning Committee Meeting 2026
MHDU News | जळगाव प्रतिनिधी : सुरेश पाटील
जळगाव : जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी दर्जेदार नियोजन, विकासकामांची वेळेत अंमलबजावणी तसेच उपलब्ध निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करण्यावर भर देण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्याने सलग चौथ्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतील १०० टक्के निधी खर्च करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी प्रभावी नियोजन, सक्षम अंमलबजावणी तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यासोबतच, सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत सर्व विकासकामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी खर्चाला गती देण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले.
बैठकीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, विविध आमदार, जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान महावितरण विभागाच्या मंजूर, पूर्ण झालेल्या आणि प्रलंबित विकासकामांची छायाचित्रांसह सविस्तर माहिती समितीसमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत ठेवणे, शवविच्छेदन गृहांची स्वच्छता सुनिश्चित करणे आणि प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मधील एकूण ८३४.६२ कोटी रुपयांच्या योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. तसेच सन २०२६-२७ साठी ९००.०५ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेचे नियोजन बैठकीत सादर करण्यात आले.
बैठकीत जिल्ह्यातील २९ शहीद जवान स्मारकांच्या कामांचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय केळी निर्यात केंद्र उभारणे, केळी कटींग व पॅकेजिंग व्हॅन उपलब्ध करून देणे, अहिराणी भाषेचा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीमध्ये समावेश करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, पर्यटन स्थळांना मान्यता देणे तसेच डोंगरी विकास कार्यक्रमास मंजुरी अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली आणि संबंधित ठरावांना मंजुरी देण्यात आली.
बैठकीत जिल्हा विकास आराखड्यांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती देण्यात आली. अंतिम मूल्यांकनानंतर जिल्ह्याला सुमारे १६ कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Jalgaon District Planning Committee Meeting 2026


[…] […]