Nashik Teacher Kunda Bacchav National Awarded
नाशिक : विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील धडे न शिकवता त्यांच्या आजूबाजूच्या परिसरालाच शिक्षणाचे माध्यम बनवणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. आनंदवली येथील मनपा शाळा क्रमांक १८मध्ये उपशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या बच्छाव यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कुंदा बच्छाव यांनी गेल्या अनेक वर्षांत शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोगशील उपक्रम उभे केले आहेत. त्यापैकी ‘ज्ञानभिंत’ हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रत्येक वेळी वर्गातच असण्याची गरज नाही, या विचारातून परिसरातील भिंतींचा शैक्षणिक उपयोग करण्यात आला. घरांच्या भिंतींवर विविध देश-राज्यांचे नकाशे, इंग्रजी शब्द, गणिती संकल्पना आणि सूत्रे साकारण्यात आली. त्यामुळे रोजच्या वाटेवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहजपणे उजळणी करता येऊ लागली.
तंत्रज्ञानाची जोड, शिक्षण अधिक अनुभवाधारित _ Nashik Teacher Kunda Bacchav National Awarded
बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना डिजिटल जगाशी जोडण्यासाठी शाळेत विविध तंत्रज्ञानाधारित प्रयोग करण्यात आले. स्मार्ट अटेंडन्स, डिजिटल अध्यापन, STEM शिक्षण, व्हर्च्युअल बायोलॉजी लॅब आणि AIच्या माध्यमातून विषय समजावून देण्याचे प्रयोग करण्यात आले.
पर्यावरण आणि विज्ञानाची सांगड घालत झाडांबाबत माहिती देण्यासाठी *QR कोडवर आधारित ‘ट्री टॉक’*सारखा उपक्रमही राबवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी ISRO भेटीचा उपक्रमही महत्त्वाचा ठरला.
शिक्षणातून मुलींच्या आयुष्याला नवी दिशा _ Nashik Teacher Kunda Bacchav National Awarded
बच्छाव यांच्या कामाची व्याप्ती शाळेच्या चार भिंतींपलीकडे गेली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलींचे शिक्षण थांबू नये, यासाठी त्यांनी शैक्षणिक पालकत्वाचा उपक्रम पुढे नेला.
२०२१ पासून १५० पेक्षा अधिक मुलींना पुढील शिक्षणासाठी मदत, मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य मिळवून देण्यात आले. काही मुलींचे शिक्षण थांबवून त्यांचा विवाह लावून देण्याच्या परिस्थितीतही हस्तक्षेप करत त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली.
लोकसहभागातून शाळेचा विकास
शाळेतील सुविधा वाढवण्यासाठी समाजातील विविध घटकांना सोबत घेत लोकसहभाग आणि CSRच्या माध्यमातून ५५ लाख रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून घेण्यात आला. त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विविध कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्यात आल्या.
दोन हजार पुस्तकांचा ज्ञानसाठा
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी आणि पुस्तकांपर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी परिसरात सुमारे दोन हजार पुस्तकांचे खुले वाचनालय उभारण्यात आले. शाळेपुरते मर्यादित न राहता परिसरातील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळावा, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे वाचन आणि प्रत्यक्ष सहभाग कमी होऊ नये यासाठी ‘मिशन मोबाईल-फ्री’ तसेच ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ यांसारखे उपक्रमही राबवण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिली उंच भरारी_ Nashik Teacher Kunda Bacchav National Awarded
‘शिका, वाचा, मोठे व्हा’, ‘मुली शिकल्या तर समाज घडतो’, तसेच Learn, Grow, Act आणि Dream, Study, Discipline, Success यांसारख्या संदेशांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि ध्येय निश्चित करण्याची वृत्ती निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
आनंदवलीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि आधुनिक संधींपासून ते वंचित राहू नयेत, या उद्देशाने बच्छाव यांनी सातत्याने काम केले.
आनंदवलीपासून राष्ट्रीय व्यासपीठापर्यंत _ Nashik Teacher Kunda Bacchav National Awarded
एका मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग करताना सुरू झालेल्या या कार्याची आता राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आहे. ज्ञानभिंतींपासून डिजिटल प्रयोगांपर्यंत, मुलींच्या शिक्षणापासून लोकसहभागातून शाळा विकासापर्यंत केलेल्या कामाचा गौरव राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या रूपाने झाला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळालेला हा सन्मान कुंदा बच्छाव यांच्या कार्याबरोबरच नाशिक महानगरपालिका शाळा आणि नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रासाठीही गौरवास्पद ठरला आहे.
-प्रतिनिधी – दीपक सरोदे _ Nashik Teacher Kunda Bacchav National Awarded

