Nashik Smart Toilet Condition
नाशिक | प्रतिनिधी : दिपक सरोदे
एकीकडे नाशिक शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी विविध विकासकामे सुरू असल्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘स्मार्ट शौचालय’ची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, बिटको महाविद्यालय, विविध शासकीय कार्यालये तसेच परिसरातील बसथांबा या ठिकाणी दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, येथील स्मार्ट शौचालयात स्वच्छतेचा अभाव, पाण्याची अपुरी व्यवस्था आणि नियमित साफसफाई न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
शौचालय वापरण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांना शौचालयाच्या बाहेरच मूत्रविसर्जन करावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या परिसरातील बसथांब्यावर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने थांबत असतात. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या मूत्रविसर्जनामुळे त्यांना लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन विद्यमान स्मार्ट शौचालयाची योग्य देखभाल, नियमित साफसफाई, पाण्याची व्यवस्था करावी किंवा आवश्यक असल्यास नवीन, स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी मागणी केली आहे.
नाशिक स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला साजेशा मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पार पाडावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
Nashik Smart Toilet Condition

