Nashikroad Bullet Pickup Accident
नाशिकरोड : मित्रांसोबत सिनेमा पाहून मध्यरात्री घरी परतणाऱ्या नाशिकरोडच्या महाविद्यालयीन तरुणाच्या बुलेटला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत बुलेटवर मागे बसलेला सैन्यदलातील त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारांसाठी पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पियुष विलास मोरे (वय २१, रा. सत्यम पार्क, जाचक नगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र अनुराग दुबे हा सैन्यदलात कार्यरत असून, सुट्टीसाठी नाशिकरोड येथे आला होता.
पियुष हा आपल्या तीन मित्रांसोबत सिटी सेंटर मॉलमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट संपल्यानंतर मध्यरात्री सुमारे दोन वाजता पियुष बुलेटवरून अनुरागला मागे बसवून घरी परतत होता. त्यांचे अन्य दोन मित्र दुसऱ्या दुचाकीवरून मागून येत होते.
पुणे रोडवरील फेम सिनेमाजवळील शिवाजीनगर परिसरातील पॉल ढाब्यासमोर बुलेट उपनगरच्या दिशेने जात असताना नाशिकरोडकडून आलेल्या पिकअपने तपोवन रोडकडे जाण्यासाठी अचानक वळण घेतले. याचवेळी बुलेटची पिकअपला जोरदार धडक झाली. अपघातात पियुष आणि अनुराग दोघेही गंभीर जखमी झाले. _ Nashikroad Bullet Pickup Accident
अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच भाजप नगरसेवक सतीश निकम यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली.
पियुषला त्याचे चुलते राज पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच पियुषचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. _ Nashikroad Bullet Pickup Accident
दरम्यान, अनुराग दुबे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पियुष हा महाविद्यालयीन द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे वडील जळगाव येथील आयटीआयमध्ये कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. पियुषच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देवळाली गाव येथील अमरधाममध्ये सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, फरार पिकअप चालकाचा शोध सुरू आहे. पोलीस हवालदार संदीप हिवाळे पुढील तपास करीत आहेत.

