Cyber Security Awareness Session Dharangaon Schools
जळगाव (धरणगाव) : डिजिटल युगात इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत असताना त्यासोबत सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षेची आव्हानेही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव तसेच पी. आर. हायस्कूल, धरणगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती सत्रांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
या उपक्रमामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर वॉरियर्स साक्षी तानाजी पाटील आणि विद्या विशाल सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, OTP, PIN, पासवर्ड आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता, तसेच सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व याबाबत सोप्या आणि प्रभावी भाषेत माहिती देण्यात आली. (Cyber Security Awareness Session Dharangaon Schools)
यावेळी विद्यार्थ्यांना Online Fraud, Phishing Links, Fake Websites, OTP Scam, Fake Calls, Password Security, Social Media Safety आणि Cyber Bullying यांसारख्या वाढत्या सायबर धोक्यांविषयी जागरूक करण्यात आले. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत OTP, PIN, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
सायबर सुरक्षेची माहिती विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी आणि मनोरंजक पद्धतीने समजावी यासाठी Interactive Activities, प्रश्नमंजुषा (Quiz) आणि Right-Wrong Games यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध ऑनलाइन परिस्थितींमध्ये कोणते वर्तन सुरक्षित आणि कोणते धोकादायक आहे, हे विद्यार्थ्यांनी स्वतः ओळखून योग्य निर्णय घेण्याचे कौशल्य आत्मसात केले.
इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे आयोजित सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सायबर सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारून आपली जिज्ञासा व्यक्त केली. तर पी. आर. हायस्कूल, धरणगाव येथे आयोजित जनजागृती सत्रात १४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमासाठी आर. बी. आमले (राजू आमले) सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पी. आर. हायस्कूल, धरणगावचे प्राचार्य दिनेश पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (Cyber Security Awareness Session Dharangaon Schools)
या जनजागृती सत्रातून विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर सजगपणे, जबाबदारीने आणि सुरक्षितपणे करावा तसेच स्वतःसोबत आपल्या कुटुंबीयांमध्येही सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करावी, असा संदेश देण्यात आला.
डिजिटल युगातील सुरक्षित, सजग आणि जबाबदार नागरिक घडविण्याच्या दिशेने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सायबर वॉरियर्स यांनी राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून दोन्ही शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
Cyber Security Awareness Session Dharangaon Schools
रेल्वेतील निकृष्ट जेवणामुळे प्रवासी संतप्त; तुकाराम मुंढे यांनी लक्ष घालावे, नागरिकांची मागणी

