Jalgaon DCC Bank Inquiry July 2026
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Jalgaon DCC Bank) संचालक मंडळाविरोधातील तक्रारीची नाशिक विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी गंभीर दखल घेतली आहे. विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांना दोन स्वतंत्र पत्रांद्वारे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही दोन्ही पत्रे १३ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आली आहेत.
पहिल्या पत्रानुसार, बँकिंग रेग्युलेशन (सुधारणा) अधिनियम, २०२५, रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वे तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशांच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रासह तक्रारदार सुरेश पाटील यांनी केलेल्या निवेदनाची दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दुसऱ्या पत्रात बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम, २०२५, RBI च्या मार्गदर्शक सूचना आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी न करता सुमारे २२ महिन्यांपासून कथित नियमबाह्य कारभार झाल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित अधिकारी व संचालकांवर आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईबाबत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या दोन्ही पत्रांमध्ये लोकनियुक्त सरपंच तथा तक्रारदार सुरेशआप्पा गो. पाटील (रा. झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार स्थानिक स्तरावर चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह वस्तुस्थितीदर्शक अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.
या घडामोडींमुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत पुढील प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Jalgaon DCC Bank Inquiry July 2026
मुद्देमाल सुपूर्दगीतून पोलिसांनी जिंकला नागरिकांचा विश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

