Girish Mahajan Nashik Kumbh Mela Reviewकुंभमेळ्याच्या विकासकामांची आणि मुसळधार पावसानंतरच्या परिस्थितीची गिरीश महाजन यांनी शहरात पाहणी केली.

Girish Mahajan Nashik Kumbh Mela Review

नाशिक | MHDU News

नाशिकमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या विकासकामांमुळे नागरिकांना सध्या काही अडचणींचा सामना करावा लागत असला, तरी या कामांमुळे शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असल्याचा विश्वास कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. “आजचा त्रास तात्पुरता आहे; मात्र पुढील वर्षी देशभरातून आणि परदेशातूनही भाविक व पर्यटक नव्या नाशिकचे दर्शन घेण्यासाठी येतील,” असे त्यांनी सांगितले.

मुसळधार पावसानंतर गिरीश महाजन यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह रामकुंड, जुने नाशिक, गंगा घाट, होळकर पूल, वाघाडी नदी परिसर, सराफ बाजार तसेच ऐतिहासिक वाड्यांची पाहणी केली. यावेळी जुन्या इमारतींची सुरक्षितता, पावसामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रसारमाध्यमांशी बोलताना महाजन यांनी सांगितले की, रात्री २ ते सकाळी ९ या अवघ्या सात तासांत सुमारे १५० मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज दिल्याने शाळा-महाविद्यालये सुरू ठेवण्यात आली होती; मात्र परिस्थिती गंभीर होताच प्रशासनाने तातडीने सुट्टी जाहीर केली.

गोदावरी नदीतील वाढलेला प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाचा परिणाम असून, गंगापूर धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या धरणात सुमारे ६५ टक्के जलसाठा असून तो ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यानंतरच नियमानुसार विसर्ग सुरू केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

या अतिवृष्टीमुळे शहरातील विविध ठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांमुळे प्रशासनाला भविष्यातील कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी प्रत्यक्ष अनुभव मिळाला असल्याचे सांगत त्यांनी याला एक प्रकारची “रंगीत तालीम” असे संबोधले. त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामासाठी निश्चित केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पर्यायी जागा निश्चित करणे किंवा सुमारे पाच फूट भराव टाकण्याचा पर्यायही प्रशासन विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी पुढील दोन-तीन दिवस अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच नदी, धबधबे किंवा पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पावसाळी गटार योजनेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या योजनेची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सहा ते सात जिल्ह्यांना तातडीच्या मदतीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीचा वापर स्थलांतर, अन्नपुरवठा, तात्पुरते निवारे आणि आपत्कालीन वाहतूक व्यवस्थेसाठी केला जाणार आहे.

Girish Mahajan Nashik Kumbh Mela Review

दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोहोचलं पाणी; गोदावरीच्या पुराचा ऐतिहासिक इशारा पुन्हा खरा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Girish Mahajan Nashik Kumbh Mela Review : कुंभमेळ्याच्या कामांमुळे काही काळ त्रास; पुढील वर्षी देशभरातून लोक नाशिक पाहायला येतील – गिरीश महाजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *