Nashik Agriculture Department Action
नाशिक : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके दर्जेदार व योग्य दरात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात तपासणी मोहीम तीव्र केली आहे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळलेल्या आणखी १३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे ९ एप्रिल २०२६ पासून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण १५४ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. _ Nashik Agriculture Department Action
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी रवींद्र माने यांच्या दालनात झालेल्या सुनावणीदरम्यान संबंधित कृषी सेवा केंद्रांकडून झालेल्या नियमभंगाची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.
कृषी विभागाच्या तपासणीमध्ये काही कृषी सेवा केंद्रांमध्ये e-POS मशीनमध्ये अनियमितता, दर फलक व साठाफलक अद्ययावत नसणे, अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, एन फॉर्ममध्ये साठा रजिस्टर न ठेवणे तसेच शेतकऱ्यांना खरेदीची पावती न देणे अशा त्रुटी आढळून आल्या.
या प्रकरणी संबंधितांना कायद्यानुसार नोटिसा बजावण्यात आल्या. प्रत्यक्ष सुनावणी घेऊन नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यानंतर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. _ Nashik Agriculture Department Action
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या १५४ परवान्यांमध्ये खतांचे १०८, बियाण्यांचे २६ आणि कीटकनाशकांचे २० परवाने आहेत. याशिवाय ५२ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
परवान्यांवर झालेल्या कारवाईच्या संख्येच्या बाबतीत नाशिक जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी कृषी सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. निकृष्ट दर्जाच्या कृषी निविष्ठांची किंवा जादा दराने विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? _ Nashik Agriculture Department Action
शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके शक्यतो अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच खरेदी करावीत. खरेदी करताना पक्के बिल व पावती अवश्य घ्यावी. कृषी सेवा केंद्राकडून नियमांचे उल्लंघन, जादा दराने विक्री किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करावी.
तक्रारींसाठी तालुकानिहाय कृषी अधिकारी, गुणनियंत्रण व कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. तसेच जिल्हास्तरीय ७६२७०३७४०८ या WhatsApp क्रमांकावरही तक्रार नोंदवता येणार आहे.
महादूत जनबिंदू प्रतिनिधी दिपक सरोदे _ Nashik Agriculture Department Action

