RPF Action At Nashik Road Railway Station
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत विविध नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये तब्बल 1,602 प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 10 लाख 28 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत प्रवेश, अनधिकृत विक्री, महिला डबा आणि दिव्यांगांसाठी राखीव डब्यात विनापरवानगी प्रवेश, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे तसेच इतर रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर RPF कडून कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये 1,379 अनधिकृत प्रवेशाची प्रकरणे आढळून आली आहेत. तसेच अनधिकृत विक्रेते, महिला डब्यात प्रवेश करणारे प्रवासी, दिव्यांगांसाठी राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणारे प्रवासी आणि नो-पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे._ RPF Action At Nashik Road Railway Station
रेल्वे स्थानक परिसरातील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. विनयभंगासारख्या गंभीर प्रकारांमध्येही संबंधितांवर कडक कारवाई केली जात असल्याचे RPF कडून सांगण्यात आले.
रेल्वे स्थानकावरील नियमभंगाच्या निर्धारित प्रकरणांमध्ये जागेवरच दंड वसूल करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्थानकात प्रवेश करताना तसेच रेल्वेने प्रवास करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत प्रवेश करू नये, महिला व दिव्यांगांसाठी राखीव डब्यांचा गैरवापर करू नये, प्लॅटफॉर्म तिकीट व प्रवासाच्या नियमांचे पालन करावे तसेच नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करू नयेत, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आले आहे.
रेल्वेचे नियम मोडल्यास दंडासोबत कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रवाशांनी नियमांचे पालन करून अनावश्यक दंड टाळावा, असे आवाहन RPF कडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी : दिपक सरोदे _ RPF Action At Nashik Road Railway Station

