Nashik Bangladeshi Couple Crime Case August 2026
नाशिक | १३ ऑगस्ट २०२६
आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून शहरात विशेष सतर्कता बाळगली जात आहे. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा (विभाग दोन)च्या पथकाने नाशिकरोड बस स्थानक परिसरातून वैध प्रवासी कागदपत्रे आणि भारतात वास्तव्याची आवश्यक परवानगी नसल्याचा संशय असलेल्या बांगलादेशी दाम्पत्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्हे शाखा (विभाग दोन)चे अंमलदार संतोष सुपेकर यांना मंगळवारी सायंकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानक पोलीस चौकीलगतच्या बस स्थानक परिसरात दोन संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांची नावे मोहम्मद साकीब मुल्ला (२२) आणि नाहिदा बादशाह मुल्ला (२१) अशी निष्पन्न झाली. दोघेही नराईल, जिल्हा खुलना, बांगलादेश येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Nashik Bangladeshi Couple Crime Case August 2026)
चौकशीत दोघे पती-पत्नी असल्याचे समोर आले. त्यांचा नाशिकमध्ये कायमस्वरूपी राहण्याचा उद्देश नसून, बांगलादेशातून भारतात आल्यानंतर नाशिक येथे काही काळ थांबून पुढे पुण्याकडे जाण्याचा त्यांचा बेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नाहिदा मुल्ला २०२५ मध्ये भारतात आली होती. पुण्यातील बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या पायल शिंदे या महिलेने नाहिदा भारतात असल्याची माहिती असूनही तिला तब्बल सहा महिने स्वतःकडे आश्रय दिल्याचा आरोप आहे. याशिवाय बनावट कागदपत्रांच्या आधारे नाहिदासाठी भारतीय आधारकार्ड तयार करून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयितांकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, बांगलादेशी सिमकार्ड, बांगलादेशी औषधे, जन्म दाखल्यांच्या तसेच राष्ट्रीय ओळखपत्राच्या छायांकित प्रती आणि बनावट आधारकार्ड जप्त केले आहे.
या प्रकरणात नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, पारपत्र नियम तसेच परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी दाम्पत्याला भारतात येण्यासाठी व वास्तव्य करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व परवानगी होती का, तसेच बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
आगामी सिंहस्थ आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, या कारवाईमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची सतर्कता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
-प्रतिनिधी : कुणाल दानेच Nashik Bangladeshi Couple Crime Case August 2026


[…] Nashik Bangladeshi Couple Crime Case August 2026 : नाशिकमध्ये बांगला… […]